खर्गे यांच्या बैठकीच्या आमंत्रणावरून गिरीश व अमित पाटकर यांच्यामध्ये वाद

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
खर्गे यांच्या बैठकीच्या आमंत्रणावरून गिरीश व अमित पाटकर यांच्यामध्ये वाद

पणजीः कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीवरून कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यामध्ये वाद रंगू लागला आहे. 

या बैठकीचे आपल्याला कसलेच आमंत्रण गिरीश चोडणकर यांच्याकडून आले नाही, असे पाटकर यांनी सांगितले. पाटकर यांना आमंत्रण पाठवल्याचे पुराव्यासहीत गिरीश चोडणकर यांनी दाखवून दिले. 

मंगळवारी पणजी येथे खर्गे यांनी बोलावलेल्या राजकीय व्यवहार बैठकीसंदर्भात विचारले असता, अमित पाटकर यांनी या बैठकीसंदर्भात आपल्याला कसलीच माहिती नसल्याचे सांगितले. 

बैठकीसाठी चोडणकर यांच्याकडून कसलेच ‌आमंत्रण आले नाही. वय वाढल्याने चोडणकर आमंत्रण पाठवायला विसरले असतील. या बैठकीला आमंत्रण का पाठवले नाही, या प्रश्नाला चोडणकर हेच उत्तर देवू शकतात, असे पाटकर यांनी सांगितले.  

या बैठकीविषयी मी मिडियाकडून ऐकतो. पण राष्ट्रीय अध्यक्ष येत असल्याने प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी आमंत्रण पाठवायला हवे होते किंवा एक फोन करायचा होता किंवा मॅसेज पाठवायची होती. त्यांनी हे केले तर दाखवावे. या विषयी पक्षाच्या शिष्टाचाराला पाळा देऊन पूर्वीच आमंत्रण द्यायला हवे होते. ऐन वेळी ५ मिनिटात जायला माझ्याकडे प्रायव्हेट जेट नाही आणि ते मला चालवायलाही कळत नाही, असा टोमणा पाटकर यांनी मारला. 

दरम्यान, गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्ल‌िकार्जुन खर्गे यांनी राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत आमंत्रण दिले नाही हे अमित पाटकर यांचे आरोप चुकीचे आहेत. पक्षाचे वरीष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी त्यांना फोन केला होता. तसेच व्हॉट्स अॅपवरही आमंत्रण पाठवले होते. याविषयी पुरावे असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.  

हेही वाचा
सर्व पहा