ब्रेन हॅमरेजनंतर वडिलांच्या उपचारासाठी धावपळ करणाऱ्या अभिनेत्याला आला अत्यंत वाईट अनुभव. ४० हजारांची औषधे खरेदी करण्याची हॉस्पिटलकडून सक्ती. तुकाराम मुंढेंचा आदेश धाब्यावर, सोलापुरात रुग्णांची लूट?

सोलापुर : मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या 'सैराट' चित्रपटातील सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख याने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक अत्यंत भावनिक आणि तितकाच खळबळजनक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभारावर पुन्हा एकदा कडाडून टीका होऊ लागली आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज हा एक अभिनेता म्हणून नाही, तर आपल्या आजारी वडिलांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारा एक हतबल मुलगा म्हणून लोकांसमोर आला आहे. आपल्या वडिलांच्या उपचाराचा अवाढव्य खर्च झेपत नसल्याने त्याने आर्थिक मदतीचे आवाहन करत असतानाच सोलापूर येथील प्रसिद्ध नोबल हॉस्पिटलच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या या व्हिडिओमुळे आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकतेवर आणि रुग्णांच्या हक्कांवर पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.
अरबाज शेख याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज आणि हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे त्यांना सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्रवेश करताच आधी दहा हजार रुपयांची अनामत रक्कम भरून घेण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी उपचारासाठी आवश्यक असलेल्या गोळ्या आणि इंजेक्शनची एक मोठी चिठ्ठी हातामध्ये सोपवली. जेव्हा अरबाजने ही औषधे बाहेरून आणण्याबाबत विचारणा केली, तेव्हा रुग्णालय प्रशासनाने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. रुग्णालयाच्याच आत असलेल्या मेडिकलमधून सर्व औषध खरेदी करणे बंधनकारक असल्याचे त्याच्यावर सक्तीने बिंबवण्यात आले. अरबाजने जेव्हा त्या अंतर्गत फार्मसीमधून औषधे घेतली, तेव्हा त्याचे बिल तब्बल चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त झाले. धक्कादायक बाब म्हणजे, तीच औषधे जर बाहेरून सामान्य मेडिकलमधून खरेदी केली असती, तर ती जवळपास अर्ध्या किमतीत उपलब्ध होत होती. रुग्णालयाच्या या सक्तीमुळे आणि होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे हतबल झालेल्या अरबाजला अखेर आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना नोबल हॉस्पिटलमधून दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले.
या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीच दिलेल्या कडक इशाऱ्याची आठवण ताजी झाली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते कि, रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणे कोणत्याही कायद्यानुसार बंधनकारक नाही. औषधे नेमकी कुठून खरेदी करायची, हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा वैयक्तिक अधिकार तसेच मूलभूत हक्क आहे. अनेक रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना तिथल्याच मेडिकलमधून महागडी औषधे आणि वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे येत आहेत. अशा प्रकारची सक्ती करणाऱ्या संस्था किंवा रुग्णालयांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, इतक्या मोठ्या अधिकाऱ्याने चेतावणी देऊनही सोलापूरच्या या रुग्णालयाने थेट एका अभिनेत्यालाच अशा सक्तीच्या जाळ्यात ओढल्याने सामान्य नागरिकांचे काय होत असेल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दुसऱ्या बाजूला, नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की अरबाज शेख याने केलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अरबाजचे वडील अत्यंत गंभीर प्रकृतीत रुग्णालयात आले होते आणि ते केवळ काही तास तिथे दाखल होते. त्यांना तात्काळ गरजेची असणारीच औषधे देण्यात आली होती आणि आमच्याच मेडिकलमधून औषधे घेण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव किंवा सक्ती करण्यात आलेली नव्हती. अरबाजने सोशल मीडियावर असे आरोप का केले, याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या गंभीर संदर्भात स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन अधिकृत प्रतिक्रिया देण्यास रुग्णालय प्रशासन तयार नसल्यामुळे संशयाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
एका बाजूला कलाकार आपल्या वडिलांच्या उपचारासाठी हतबल होऊन डोळ्यात पाणी आणून मदतीची याचना करतो, तिकडे दुसरीकडे शासकीय आदेशांना केराची टोपली दाखवून नफेखोरी करणाऱ्या रुग्णालयांवर आता अन्न व औषध प्रशासन नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.