Home >> देश -परदेश >> मला वाचवा, हे किडनॅपर आहेत! अभ्यास टाळण्यासाठी १२ वर्षांच्या मुलाचा ड्रामा

मला वाचवा, हे किडनॅपर आहेत! अभ्यास टाळण्यासाठी १२ वर्षांच्या मुलाचा ड्रामा

मध्यरात्री सत्य समोर आल्यावर पोलीसही चक्रावले

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
6 hours ago
मला वाचवा, हे किडनॅपर आहेत! अभ्यास टाळण्यासाठी १२ वर्षांच्या मुलाचा ड्रामा

गोरखपूर : शाळेत आणि घरामध्ये होणारा अभ्यास टाळण्यासाठी मुलांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका १२ वर्षांच्या मुलाने अभ्यासाच्या भीतीने थेट स्वतःच्याच अपहरणाचा असा काही हायव्होल्टेज ड्रामा रचला, ज्याने पोलिसांची चांगलीच झोप उडवली. 

नेमकी घटना काय?

गोरखपूरच्या शास्त्री नगर कॉलनीत राहणारे भारत भूषण शुक्ला यांचा मुलगा आर्यन (१२, नाव बदलले आहे) हा ६वीच्या वर्गात शिकतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आर्यन राप्ती नगर येथील आपल्या आजोळी गेला होता. तिथे त्याला कोणीही अभ्यासाला बसवत नसल्याने, सुट्ट्या संपल्यावरही त्याचा तिथेच राहण्याचा हट्ट होता. आर्यन अभ्यास करत नसल्याचे पाहून अखेर त्याची आई त्याला आणण्यासाठी माहेरी गेली. मात्र, आर्यन काही केल्या घरी येण्यास तयार नव्हता.

आईने जबरदस्तीने आर्यनला त्याचा मामा आणि स्वतःसोबत बाईकवर बसवले आणि ते घराकडे निघाले. आता घरी गेल्यावर अभ्यास करावा लागणार या भीतीने आर्यनने चालत्या बाईकवरूनच रस्त्यात वाचवा-वाचवा, किडनॅपर... असा जोरात आरडाओरडा सुरू केला. रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला खरोखरच मुलाचे अपहरण होत असल्याचा संशय आला. त्याने वेळ न घालवता तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याची माहिती दिली. हे संपूर्ण प्रकरण चिलुवाताल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले.

मुलाच्या अपहरणाची गंभीर माहिती मिळताच चिलुवाताल आणि गुलरिहा या दोन पोलीस ठाण्यांची पथके तात्काळ सतर्क झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळायला सुरुवात केली. तब्बल ३ ते ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर, रात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्या बाईकचा शोध घेत शुक्ला यांच्या घरात प्रवेश केला. मात्र, तिथे आर्यन आपल्या आई आणि मामासोबत सुरक्षित बसलेला दिसला.

मुलाचे कोणतेही अपहरण झाले नव्हते. आर्यनला आजोळीच मज्जा करायची होती आणि घरी जाऊन अभ्यास करण्याची त्याची इच्छा नव्हती. याच भीतीने त्याने बाईकवरून खोटा आरडाओरडा केला होता. मुलगा पूर्णपणे सुरक्षित असून पालकांना आणि मुलाला योग्य समज देण्यात आली आहे.

केवळ अभ्यासाचा कंटाळा आणि आजोळचा लळा यामुळे एका लहान मुलाने केलेल्या या कृत्याने पोलीस प्रशासनाची काही तास चांगलीच तारांबळ उडवली. या अजब प्रकरणाची सध्या संपूर्ण गोरखपूरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा