Home >> देश -परदेश >> उत्तर प्रदेशात माजी आरटीओ अधिकाऱ्याच्या घरी छापा; ३५ कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त

उत्तर प्रदेशात माजी आरटीओ अधिकाऱ्याच्या घरी छापा; ३५ कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13 hours ago
उत्तर प्रदेशात माजी आरटीओ अधिकाऱ्याच्या घरी छापा; ३५ कोटींची बेहिशेबी संपत्ती  जप्त

लखनऊ : उत्तर प्रदेश दक्षता (व्हिजिलन्स) विभागाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात माजी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO) ललित कुमार यांच्या लखनऊतील निवासस्थानी धाड टाकण्यात आली. (UP vigilance raids ex-transport officer, recovers assets worth Rs 35 crore) छाप्यात तब्बल ₹३५ कोटींची रोकड, सोने-चांदी, मालमत्ता आणि गुंतवणुकीचे पुरावे जप्त केले आहेत. या कारवाईमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दक्षता विभागाच्या माहितीनुसार, लखनऊच्या अलीगंज येथील चंद्रलोक कॉलनीतील निवासस्थानी मंगळवार व बुधवारी न्यायालयीन शोध वॉरंटच्या आधारे छापेमारी करण्यात आली. ललित कुमार हे आग्रा येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचा ठपका ठेवल्यानंतर त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

छाप्यामध्ये ₹१.६२ कोटींची रोख रक्कम, घरातील विविध ठिकाणी लपवून ठेवलेली आढळली. १३ किलो सोने (बार, विटा आणि दागिन्यांच्या स्वरूपात) आणि ९ किलो चांदी (बार, बिस्किटे व दागिने) जप्त करण्यात आली. सरकारी मान्यताप्राप्त मूल्यांकनकर्त्याने या मौल्यवान धातू व दागिन्यांची किंमत सुमारे २० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

याशिवाय लखनऊ, बाराबंकी आणि रायबरेली जिल्ह्यांतील घरे, भूखंड, शेतीजमीन,  लखनऊ आणि नोएडा येथील फ्लॅट बुकिंगशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली. या स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे १३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

तपासादरम्यान ₹१ कोटींहून अधिक रकमेची बँक ठेवी, पोस्ट ऑफिस योजना, म्युच्युअल फंड आणि मुदत ठेवींची कागदपत्रे,  टोयोटा इनोव्हा, ह्युंदाई आय२० कार आणि एक रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आला. घरातील महागड्या वस्तूंची स्वतंत्र यादीही तयार करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश दक्षता विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्ता आणि गुंतवणुकीची सखोल पडताळणी सुरू आहे.  तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल लखनऊ विभागाच्या पथकाला ₹१ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा