सोशल मीडियावर रायगडमधील या अजब आणि गंभीर घटनेची जोरदार चर्चा सुरू

रायगड : जिल्ह्यात सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने केवळ जनजीवनच विस्कळीत केले नाही, तर थेट औद्योगिक क्षेत्रालाही एका मोठ्या संकटात ढकलले आहे. रसायनी येथील पाताळगंगा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे एचपीसीएल (HPCL) कंपनीच्या एलपीजी बॉटलिंग प्लांटला पुराचा मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आणि हे पुराचे पाणी थेट गॅस प्लांटच्या आवारात शिरले.
या वेगवान पाण्याच्या प्रवाहात प्लांटमधील तब्बल तीन हजार एलपीजी गॅस सिलेंडर नदीत वाहून गेल्याची धक्कादायक व गंभीर घटना समोर आली आहे. या अजब आणि तितक्याच चिंताजनक घटनेमुळे सोशल मीडियावर सध्या कमालीची चर्चा सुरू असून तरुण वर्गामध्येही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या आहेत. वाहून गेलेले गॅस सिलेंडर नदीपात्रात किंवा नदीकाठच्या गावांमध्ये वाहून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही नागरिकाला किंवा गावकऱ्याला असे गॅस सिलेंडर आढळल्यास त्यांनी ते स्वतः हाताळण्याचा किंवा स्वतःजवळ ठेवण्याचा अजिबात प्रयत्न करू नये, असे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.
हे सिलेंडर धोकादायक ठरू शकत असल्याने, ते आढळल्यास त्याची माहिती तात्काळ एचपीसीएल कंपनी, जवळचे अधिकृत डिलर, तहसीलदार कार्यालय खालापूर, तहसीलदार कार्यालय पेण किंवा उपविभागीय अधिकारी पेण यांच्या कार्यालयाला द्यावी आणि तिथे ते जमा करावेत. सध्या स्थानिक यंत्रणा आणि कंपनीचे अधिकारी नदीपात्रात या सिलेंडर्सचा शोध घेत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी बजावले आहे.