धिरयोच्या आड घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जुगारही राजरोसपणे सुरू असल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा दावा.

मडगाव: नावेली परिसरातील तळावली येथील पुलाजवळ बेकायदेशीरपणे बैलांच्या झुंजीचे (धिरयो) आयोजन करण्यात आले होते. या धिरयोदरम्यान मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. याबाबत पोलिसांना पूर्वकल्पना देऊनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या रोशनी रॉड्रिग्ज यांनी केला आहे.
रोशनी रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, तळावली येथे बेकायदेशीर धिरयो सुरू असून तिथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी फिरकणेही टाळले.
तळावली येथील धिरयो आयोजनासोबतच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगारही सुरू असल्याचा दावा रोशनी यांनी केला आहे. पोलिसांकडून वेळीच कारवाई होत नसल्यामुळेच असे बेकायदेशीर धिरयो आणि अवैध प्रकार राजरोसपणे सुरू आहेत, अशी संतप्त टीकाही त्यांनी केली.