ग्राहक न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

रायपूर: देशात पर्यावरणपूरक अशा ‘ई२०’ (२० टक्के इथेनॉल मिश्रित) इंधनाचा वापर वाढवला जात असतानाच, या इंधनामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या वादावर एका ग्राहक न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा ग्राहक न्यायालयाने कार मालकाच्या बाजूने निकाल देत, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या नामांकित कार कंपनीला ग्राहकाला नवी कार देण्याचे आदेश दिले आहेत. भारतातील ई२० इंधनाच्या दुष्परिणामांशी संबंधित प्रकरणातील हा अशा प्रकारचा पहिलाच मोठा निर्णय मानला जात आहे.
तक्रारदार ग्राहकाने २०२४ मध्ये मारुती सुझुकीची सुमारे २०.५० लाख रुपयांची कार खरेदी केली होती. ही कार सुरुवातीला उत्तम चालत होती; मात्र पेट्रोल पंपावर मिळणारे ई२० इंधन वापरण्यास सुरुवात केल्यानंतर कारच्या इंजिनमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या. इंजिनची कार्यक्षमता खालावणे, मिसफायरिंग होणे आणि मायलेज कमालीचे घटणे अशा तक्रारी सुरू झाल्या. कार वारंवार सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊनही दुरुस्तीचा काहीच फायदा झाला नाही, उलट ग्राहकाचा आर्थिक भुर्दंड वाढत गेला.
तक्रारदाराने ग्राहक न्यायालयासमोर भक्कम पुरावे सादर केले. कारच्या वर्कशॉप दुरुस्तीदरम्यान इंधन टाकीत आणि इंजिनमध्ये एक पांढरा, अत्यंत चिकट द्रव जमा झाल्याचे आढळून आले होते, ज्यामुळे इंजिनचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे, कार उत्पादक कंपनी आणि डीलरने न्यायालयात दावा केला होता की, सदर मॉडेल हे ई२० इंधनावर चालण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. ग्राहकाच्या चुकीच्या देखभालीमुळे आणि नेहमीच्या वापरामुळे कारमध्ये बिघाड झाल्याचा दावा डीलरने केला. मात्र, न्यायालयाने डीलरचा हा युक्तिवाद फेटाळून लावत कार कंपनीलाच या बिघाडासाठी पूर्णपणे जबाबदार धरले.
न्यायालयाने मारुती सुझुकी कंपनीला आदेश दिले आहेत की, त्यांनी ४५ दिवसांच्या आत तक्रारदाराला त्याच मॉडेलची नवीन कार द्यावी, जी ई२० इंधनावर विना अडथळा चालू शकेल. जर कंपनी नवीन कार देण्यास अपयशी ठरली, तर ग्राहकाला कारची संपूर्ण खरेदी किंमत म्हणजेच २०.५० लाख परत करावे लागतील. ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासासाठी १ लाख आणि खटल्याच्या खर्चापोटी १०,००० देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
वाहन चालकांसाठी महत्त्वाचा निकाल
देशभरात इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा पुरवठा वेगाने सुरू असताना, जुन्या आणि नव्या अनेक गाड्यांच्या इंजिनवर त्याचा काय परिणाम होतो, यावरून सातत्याने वाद सुरू आहेत. अशा परिस्थितीत रायपूर ग्राहक न्यायालयाने दिलेला हा निकाल वाहन ग्राहकांना मोठा दिलासा देणारा आणि वाहन उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणणारा ठरणार आहे.