विमाविना वाहनांना महिनाभराची मुदत, मात्र इतर नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई

पणजी : गोव्यात बसविण्यात आलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित वाहतूक कॅमेरे हे नागरिकांकडून दंड वसूल करण्यासाठी नव्हे, तर वाहतुकीत शिस्त निर्माण करण्यासाठी आहेत. वाहन चालकांनी नियमांचे पालन करून वाहने चालवावीत, रस्त्यावर जाणारे बळी रोखण्यासाठी ही खास तरतूद केली असल्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले.
गोव्यातील प्रमुख रस्त्यांवर AI कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे. वाहन चालकही संभ्रमात आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी मिडियाशी संवाद साधत वरील माहिती दिली.
राज्यात AI कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू होत असताना नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. या यंत्रणेचा मुख्य उद्देश रस्ते अपघात कमी करणे, वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत आणि नागरिकांमध्ये सुरक्षित वाहने चालवण्याची सवय निर्माण व्हावी, हा असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, विमा नसलेल्या वाहनधारकांना तत्काळ दंड करण्याऐवजी विमा नूतनीकरण करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे. या कालावधीत वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. वाहनांचा विमा न उतरवता वाहने कशी हाकली जातात? असा प्रश्नही उपस्थित केला. विनाविमा वाहन चालवणे खूप धोकादायक असून, एखादा अपघात घडून कुणी दगावल्यास, विमा नसेल तर वाहन मालकांना आपल्या खिशातून त्यांच्या कुटुंबियांना लाखो रुपये द्यावे लागतील याची जाणिव ठेवावी व लवकर वाहनांचा विमा उतरवावा असे आवाहनही गुदिन्हो यांनी केले.
इतर नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई
मात्र, सिग्नल तोडणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, हेल्मेट किंवा सीटबेल्टचा वापर न करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर AI कॅमेऱ्यांच्या आधारे नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध
वाहतूक व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन माविन गुदिन्हो यांनी केले.