Home >> गोवा >> घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; सत्तरीत जनजीवन विस्कळीत

घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; सत्तरीत जनजीवन विस्कळीत

वेळूस नदीच्या वाढत्या पाण्याने पालीतील श्री दत्तात्रेय मंदिराला वेढा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
41 mins ago
घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; सत्तरीत जनजीवन विस्कळीत

वाळपई : शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. 

सुदैवाने वृत्त लिहिपर्यंत कोणतीही मोठी नैसर्गिक पडझड किंवा जीवितहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नसली, तरी अनेक भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.

विशेषतः चोर्ला घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने वेळूस नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. या वाढलेल्या पाण्याचा परिणाम ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील पाली-सत्तरी येथील श्री दत्तात्रेय मंदिर परिसरावर झाला. नदीला आलेल्या पाण्यामुळे मंदिराच्या सभोवताली पाण्याचा वेढा पडला. मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचल्याने परिसर पूर्णपणे जलमय झाला. मंदिराकडे जाणारा रस्ता आणि प्रवेशमार्ग काही काळ पाण्याखाली गेल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करता आला नाही. मंदिरा शेजारील शेडमध्येही पाणी शिरल्याचे दिसून आले.

या घटनेमुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच अनेक नागरिकांनी मंदिर परिसरात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. सुदैवाने सुमारे दोन तासांत नदीचे पाणी ओसरू लागल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला. अन्यथा पाण्याची पातळी आणखी वाढल्यास मंदिरातही पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

दत्तात्रेय मंदिर वेळूस नदीच्या अगदी काठावर असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर मंदिर परिसरात पाणी साचण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. गेल्या वर्षीही अशाच प्रकारची परिस्थिती अनेक वेळा निर्माण झाली होती. मात्र, यंदाच्या मान्सून हंगामात पहिल्याच मोठ्या पावसात मंदिर परिसर जलमय झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, तालुक्यातील (Sattari Taluka) वाळपई, होंडा, केरी, नगरगाव, गुळेली, ठाणे, चरावणे, हिवरे आदी भागांतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वाहनचालकांनी पाणी ओसरेपर्यंत प्रतीक्षा करणे पसंत केले. सुमारे तासाभरानंतर पाणी ओसरल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

सतर्कतेचा इशारा

घाटमाथ्यावर अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची तसेच नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यकपणे नदीकाठी किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागानेही पुढील काही दिवस गोवा व घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. महसूल, अग्निशमन, पोलीस आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार तातडीने मदतकार्य करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा