
पेडणे : मोरजी येथे गेले असता आपल्याला मारहाण केल्याची तक्रार करणारे अंकुर कुमार यांच्याविरोधात मुलीला कारची धडक दिल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
तेंबवाडा, मोरजी येथील दिलीप एल. मंगेश मोर्जे यांनी यासंदर्भात मांद्रे पोलीस स्थानकात (Mandrem Police station) केलेल्या तक्रारीत अंकुर कुमार व इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, १७ जुलै रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार आपल्या कुटुंबीयांसह सर्व्हे क्रमांक ११९/३ या मालमत्तेत उपस्थित होते. त्यावेळी तक्रारदाराची मुलगी दीपिका दिगंबर तारी ही घरालगतच्या अंतर्गत रस्त्यावरून चालत होती. याच वेळी अंकुर कुमार हा अनिल नाईक यांच्यासोबत चारचाकी वाहनातून आला.
वाहन रिव्हर्स घेताना तक्रारदाराचे मेहुणे शिवा पेडणेकर यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी वेळीच बाजूला उडी घेतल्याने अनर्थ टळला. यानंतर वाहनाने तक्रारदाराच्या दगडी कुंपणाला धडक देऊन नुकसान केले. त्यानंतर वाहन वेगाने पुढे नेत तक्रारदाराच्या मुलीच्या डाव्या पायाला धडक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
एकूण घटना पाहताच तक्रारदार मुलीला वाचविण्यासाठी धावले. मात्र वाहन थांबविण्याऐवजी पुन्हा भरधाव वेगाने रिव्हर्स घेतल्याने उपस्थितांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या गोंधळात तक्रारदाराच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याचा हार हरवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मुलीला वाचविताना तक्रारदाराच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अंकुर कुमार सोबत असलेले अनिल नाईक हे शेजारील मालमत्तेवर हक्क सांगत असून त्या संदर्भातील वाद न्यायप्रविष्ट आहे. सदर घटना ही त्या वादाशी संबंधित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.