
पणजी : गुंतवणुकीस अनुकूल असण्याच्या क्रमवारीत गोवा देशात चौथ्या क्रमांकावर आहे. नीती आयोगाने नुकत्याच जारी केलेल्या गुंतवणूक स्नेही निर्देशांकातून ही माहिती मिळाली आहे. यासाठी २८ राज्ये आणि ८ केंद्र शासित प्रदेशातील सरकारांनी तयार केलेल्या विविध धोरणे, तेथील साधन सुविधा व निकषांवरून गुण देण्यात आले. लहान राज्य असूनही या निर्देशांकात गोव्याने ५३.१ गुण मिळवले आहेत. निर्देशांकात ५६.६ गुणांसह गुजरात प्रथम स्थानी आहे. महाराष्ट्र (५३.७ गुण) दुसऱ्या, तामिळनाडू ( ५३.३ गुण) तिसऱ्या तर ओडिशा (५२.४ गुण) पाचव्या क्रमांकावर आहे.
निर्देशांकानुसार गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी
गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीने देशातील विविध राज्ये किती सक्षम आहेत हे समजून घेण्यासाठी गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक तयार करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांसाठी एखादे राज्य आकर्षक का ठरते आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो याचे मूल्यांकन देखील यामध्ये केले जात आहे. हा निर्देशांक आठ मुख्य घटकांवर लक्ष केंद्रीत करतो. यामध्ये राज्यातील पायाभूत सुविधा, व्यवसायासाठी पोषक वातावरण, संसाधने, सरकारी धोरण, नियमन विषयक सुलभता, संस्थात्मक वातावरण, आर्थिक स्थिती आणि पर्यावरणीय लवचिकता यांचा समावेश आहे. याशिवाय या आठ घटकांमध्ये ९५३ अन्य उपघटकांचा अभ्यास करण्यात आला.
गोव्यात चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा
गोव्यात चांगल्या दर्जाच्या पायभूत सुविधा उपलब्ध आहेत. येथे विविध संसाधने विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. येथील मोठ्या क्षमतेचे विमानतळ गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ठरतील. तसेच राज्य सरकारने कौशल्य विकासासाठी पुरेशा प्रमाणात अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. असे असले तरी गोव्यातील संस्थात्मक वातावरण आणि सरकारचे आर्थिक दायित्व म्हणजेच कर्ज, देणी या क्षेत्रात अधिक सुधारणा आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
गोव्याला नियमन सुलभतेमध्ये ७१ टक्के गुण
गोव्याने मिळवलेल्या एकूण गुणांपैकी नियमन सुलभतेमध्ये ७१ टक्के गुण मिळवले आहेत. संस्थात्मक वातावरणामध्ये ६६ टक्के, आर्थिक सुदृढतेमध्ये ६१ टक्के, पायाभूत सुविधा व संसाधने या निकषात प्रत्येकी ५६ टक्के गुण मिळवले आहेत. गोव्याने व्यावसायिक वातावरण (४२ टक्के) आणि सरकारी धोरण (२६ टक्के) या निकषांमध्येही राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.