स्कायक्रूटच्या 'विक्रम-१' या सात मजली रॉकेटने पृथ्वीच्या ४५० किमी कक्षेत प्रवेश केला. हा केवळ एक आरंभ आहे, पंतप्रधान मोदींनी स्कायरुट टीमचे केले कौतुक.

श्रीहरिकोटा : भारताच्या अंतराळ क्षेत्रात आज एक सुवर्णअध्याय लिहिला गेला आहे. हैदराबादस्थित 'स्कायरुट एरोस्पेस' (Skyroot Aerospace) या खासगी कंपनीने विकसित केलेल्या 'विक्रम-१' (Vikram-1) या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल-क्लास रॉकेटचे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 'मिशन आगमन' (Mission Aagaman) नावाच्या या मोहिमेमुळे भारत आता अमेरिका आणि चीननंतर खासगी कंपनीद्वारे उपग्रह कक्षेत सोडण्याची क्षमता असलेला जगातील तिसरा देश बनला आहे.
वेळेत का झाला बदल?
हे ऐतिहासिक प्रक्षेपण आधी सकाळी ११:३० वाजता होणार होते. मात्र, प्रक्षेपणाच्या अवघ्या ५ मिनिटे आधी काउंटडाउन नियोजित पद्धतीने थांबवण्यात आले (Planned Pause). एक छोटी तांत्रिक त्रुटी रिसोल्व केल्यानंतर, दुपारी १२:०५ वाजता रॉकेटने अंतराळाच्या दिशेने यशस्वी उड्डाण केले.
'मिशन आगमन'चे टप्पे कसे पार पडले?
स्कायक्रूटने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेटने तिन्ही सॉलिड-प्रोपल्शन टप्पे अत्यंत अचूकतेने पूर्ण केले:
१. स्टेज १ (कलाम-१२००): या शक्तिशाली पहिल्या टप्प्याने रॉकेटला पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जाड स्तरातून यशस्वीरीत्या बाहेर काढले.
२. पेलोड फेअरिंग वेगळे होणे: वातावरणाचा थर पार केल्यानंतर रॉकेटचे संरक्षक कवच (Shell) वेगळे झाले आणि उपग्रहांनी पहिल्यांदाच अंतराळात प्रवेश केला.
३. स्टेज २ आणि ३ (कलाम-२५० व कलाम-१००): रॉकेटच्या या पुढील भागांनी अचूक जळत (Burn) रॉकेटला ४५० किमी दूर असलेल्या लो अर्थ ऑर्बिटच्या (LEO) दिशेने पुढे ढकलले आणि पेलोड यशस्वीरीत्या प्रस्थापित केले.

अंतराळातील 'कॅब सर्व्हिस' काय आहे?
स्कायक्रूट एरोस्पेसचे उद्दिष्ट अंतराळात एका 'कॅब सर्व्हिस'प्रमाणे सेवा देण्याचे आहे. म्हणजेच, जगभरातील लहान-मोठ्या कंपन्यांना त्यांचे उपग्रह अंतराळातील त्यांच्या हव्या त्या विशिष्ट कक्षेत सोडण्यासाठी स्कायरुटचे रॉकेट भाड्याने घेता येईल. यामुळे उपग्रह प्रक्षेपण अत्यंत सोपे, जलद आणि परवडणारे होणार आहे. २०२२ मधील 'विक्रम-एस' या सब-ऑर्बिटल मोहिमेच्या यशानंतर स्कायक्रूटचे हे पुढचे मोठे पाऊल आहे.

पंतप्रधान मोदींचा विशेष संदेश आणि कौतुक
या रॉकेटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'वंदे मातरम' हा संदेश एका विशेष कार्डवर मुद्रित करून अंतराळात पाठवण्यात आला आहे. यासोबतच जगभरातील लोकांच्या आकांक्षा आणि शुभेच्छांची शेकडो कार्डेही अंतराळात झेपावली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहिले आणि स्कायक्रूटच्या टीमचे कौतुक करताना म्हटले, तुम्ही भारताला अंतराळ क्षेत्रात 'आत्मनिर्भर' बनवून दाखवले आहे. ही केवळ एक सुरुवात आहे, आपल्याला या प्रवासात आणखी पुढे जायचे आहे. त्यांनी संपूर्ण टीमला भेटीचे आमंत्रणही दिले आहे.
