कृषी संचालक चंद्रहास नाईक देसाई यांनी १५ दिवसांत अहवाल मागवला. 'गोवा कॅन'च्या तक्रारीची दखल.

मडगाव : सासष्टीसह राज्यातील इतर तालुक्यांमध्ये रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवर विनापरवाना चालणाऱ्या बेकायदेशीर रोपवाटिकांवर (नर्सरी) कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश कृषी संचालक चंद्रहास नाईक देसाई यांनी दिले आहेत. सर्व विभागीय कृषी अधिकाऱ्यांना (AO) आपापल्या कार्यक्षेत्रात सखोल तपासणी करून पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
'गोवा कॅन' या ग्राहक संघटनेने यासंदर्भात कृषी संचालनालयाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सासष्टी तालुक्यात, विशेषतः नुवे-मडगाव वेस्टर्न बायपास परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत हातगाड्यांद्वारे फळझाडांची आणि शोभेच्या फुलांच्या रोपांची विक्री केली जात असल्याचे उघड करण्यात आले होते. अशा प्रकारे विनापरवाना झाडांची विक्री करणे 'द गोवा फ्रूट अँड ऑर्नामेंटल प्लांट्स नर्सरीज (रेग्युलेशन) ॲक्ट, १९९५' मधील नियमांचे थेट उल्लंघन आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत कृषी संचालकांनी सर्व विभागीय कृषी अधिकाऱ्यांना पोलिसांची मदत घेऊन या बेकायदेशीर विक्रेत्यांवर आणि हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
कायद्यानुसार हातगाड्यांवरून झाडांची व्यावसायिक विक्री करण्यास बंदी असून, असे आढळल्यास ती रोपे जप्त करण्याची तरतूद आहे. याशिवाय, सर्व अधिकृत व परवानाधारक रोपवाटिकांसाठी कृषी खात्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार प्रत्येक परवानाधारक रोपवाटिकेने आपल्या आवारात माहिती फलक लावणे बंधनकारक आहे. या फलकावर रोपवाटिकेचे नाव, पत्ता, मालकाचे नाव, संपर्क क्रमांक आणि परवान्याच्या वैधतेची तारीख ठळकपणे लिहिलेली असावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.