Home >> गोवा >> ॲड. अंकुर कुमार हल्लाप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

ॲड. अंकुर कुमार हल्लाप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

उत्तर गोवा जिल्हा वकील संघटनेचे डीआयजींना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
ॲड. अंकुर कुमार हल्लाप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

पणजी : मोरजी येथे ॲड. अंकुर कुमार यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उत्तर गोवा जिल्हा वकील संघटनेने (North Goa District Advocates Association)  केली आहे.

या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) वेदप्रकाश सूर्या यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी आणि वकिलांच्या सुरक्षिततेची हमी मिळण्यासाठी या प्रकरणाचा तातडीने तपास करून याप्रकरणातील संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी संघटेने पोलिसांकडे केली आहे. वकिलांवरील हल्ल्याच्या घटना गंभीर असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस आणि प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना उत्तर गोवा जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. संतोष भरणे यांनी सांगितले की, ॲड. अंकुर कुमार बेकायदेशीर बांधकामासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या अशिलाबरोबर गेले होते. त्यावेळी त्यांना जबर मारहाण करण्यात आली. एकूण घटनेविषयी सविस्तर माहिती डीआयजी वेदप्रकाश सूर्या व इतर उपस्थित पोलीस अधिकारी यांना दिली आहे.

याप्रकरणाचा तपास कशाप्रकारे चालला आहे यासंदर्भात माहिती घेतली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून एकाला अटक केली आहे. सध्या तरी तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. यापूर्वी एका वकीलाला अशाच प्रकारे मारहाण झाली होती, यासंदर्भात विचारले असता; त्यावेळी आम्ही पोलीस अधिकार भेटून कारवाई करण्याची मागणी केली होती. कारण त्यावेळी तपास संथगतीने सुरू होता. आम्ही आवाज उठवल्यावर एफआयआर नोंदवून कारवाई करण्यात आल्याचे ॲड. संतोष भरणे म्हणाले. 

यापुढे पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था होणार : ॲड. भरणे 

डीआयजी वेदप्रकाश सूर्या यांनी आम्हाला यापुढे न्यायालयाच्या आदेशांवरून अशा प्रकारची पाहणी करण्यासाठी जाताना पोलिसांना कळीत करावे. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त पाठवण्याची सोय केली जाणार असल्याचे सांगितले आहे. ही माहिती आम्ही सर्व वकिलांपर्यंत पोहोचवून यापुढे यासंदर्भात योग्य खबरदारी घेण्याचे व पोलिसांना कळीत करण्यास सांगणार आहोत, असे ॲड. भरणे म्हणाले. 

हेही वाचा
सर्व पहा