पणजीत लोकसाहित्य संमेलनाचे उद्घाटन

पणजी : निसर्ग आहे म्हणून मानव आहे. मानव असल्याने लोकसंस्कृती आहे. लोक साहित्यातील कथा, नृत्य, सण, उत्सव म्हणी आदीतून निसर्गाचे आभार व्यक्त केले जातात. निसर्गाने मानवाला दिलेल्या देणगी बाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते.
गोव्यातील लोकसाहित्याचा खरा आत्मा निसर्गात असल्याचे प्रतिपादन डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी केले. पणजीत विवेकानंद सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित लोकसाहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पौर्णिमा केरकर, दशरथ परब, अशोक परब, कमलाकर म्हाळगी उपस्थित होते.
फळदेसाई म्हणाले की, आपल्या जीवनाचा मुख्य आधार निसर्ग आहे. निसर्गाचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी लोकसाहित्य निर्माण केले. लोकसाहित्यामध्ये नद्या, डोंगर, झाडे, जमीन आदींचे आभार मानले जातात. धालोचा मूळ उद्देश भूमातेचे आभार व्यक्त करणे आहे. राज्यातील अन्य विविध लोकसंस्कृती प्रकारात देखील माती, जमिनीबाबत कृतज्ञता व्यक्त केल्याचे आढळते. लोकसंस्कृती निसर्गावर प्रेम करण्याची शिकवण देते. तसेच निसर्गाचे रक्षण करण्याची प्रेरणा देखील देते.
ते म्हणाले, लोकसाहित्य लोकांच्या मनोरंजनासह त्यांना ज्ञान देण्याचे काम देखील करते. लोकसाहित्याचा कर्ता एखादी व्यक्ती नसून संपूर्ण समाज असतो. गोव्यात लोकसंस्कृती, लोकसाहित्याचा अभ्यास उशिराने सुरू झाला.
राज्यातील युवकांनी आपल्या लोकसंस्कृतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. लोकसंस्कृतीचे रक्षण करण्याची काम युवा पिढीवर आहे. लोकांनी उघड्या डोळ्यांनी आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे हे पहावे. आपल्या सभोवताली सुरू असणारे लोकनृत्य, कला, संगीत समजून घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
युवकांनी सजग राहणे आवश्यक
पौर्णिमा केरकर म्हणाल्या की, गोमंतकीय लोकजीवन व लोक साहित्याविषयी नव्या पिढीत उत्सुकता निर्माण होऊन त्यांच्यामध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन वाढवा या हेतूने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आपली वैभवशाली संस्कृती, संस्कार, संचित याबाबत युवकांनी सजग राहणे आवश्यक आहे.