Home >> देश -परदेश >> अमेरिका–इराण संघर्ष; दक्षिण इराणातील पाणीपुरवठा खंडित

अमेरिका–इराण संघर्ष; दक्षिण इराणातील पाणीपुरवठा खंडित

इराणचा ‘पूर्ण क्षमतेच्या हल्ल्याचा’ इशारा सातव्या रात्रीही अमेरिकेचे हवाई हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात तणाव शिगेला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
अमेरिका–इराण संघर्ष; दक्षिण इराणातील पाणीपुरवठा खंडित

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष सातव्या सलग रात्रीही तीव्र राहिला. अमेरिकेने दक्षिण इराणातील अनेक लष्करी तसेच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमुळे होर्मोझगान प्रांतातील अनेक गावांचा वीज आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. (US forces struck Iran for a seventh straight night, destroying a surveillance tower at Chabahar port and cutting water supplies to villages in Hormozgan province after strikes on electricity and desalination infrastructure.)

अमेरिकन लष्कराने चाबहार बंदर परिसरातील निगराणी मनोरा, लष्करी रसद केंद्रे, भूमिगत शस्त्रसाठे आणि सागरी क्षमतांशी संबंधित ठिकाणांवर हल्ले केल्याचे सेंट्रल कमांडने (CENTCOM)  म्हटले आहे. चाबहार येथील समुद्री निगराणी मनोरा पूर्णपणे कोसळल्याचेही वृत्त आहे.

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद 

हल्ल्यांमध्ये जास्क तालुक्यातील मिठविरहित पाणी निर्मिती (डिसॅलिनेशन) प्रकल्प, वीज यंत्रणा आणि पूलांचे नुकसान झाल्याने अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद पडला आहे. प्रशासनाकडून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.

कठोर पत्युत्तराचा इराणचा इशारा 

दरम्यान, इराणने अमेरिकेच्या वाढत्या कारवाईला कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल मोहसिन रेझाई यांनी, "अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवल्यास इराण पूर्ण क्षमतेने आक्रमक कारवाई करेल. कोणतीही राजकीय सीमा सुरक्षित राहणार नाही," असा इशारा दिला.

इराणचे बहरीन, कुवेत, जॉर्डन, सीर‌ियातील अमेरिकी तळांवर हल्ले

याचबरोबर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने बहरीन, कुवेत, जॉर्डन आणि सीरियातील अमेरिकेशी संबंधित लष्करी तळांवर हल्ल्यांचा दावा केला आहे. कुवेतने शत्रूची ड्रोन पाडल्याचे, तर जॉर्डनने दहा क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचे सांगितले आहे. कतार आणि बहरीनमध्येही हवाई हल्ल्याचे सायरन वाजविण्यात आले.

जहाज वाहतुकीवरही मोठा परिणाम

या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या सामुद्रधुनीतून होत असल्याने जागतिक ऊर्जा बाजारातही चिंता वाढली आहे.

इराणच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नव्या हल्ल्यांत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  शेकडो जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, अमेरिकेच्या लष्करानेही मध्यपूर्वेतील कारवाईदरम्यान काही सैनिक जखमी झाल्याची कबुली दिली आहे.

वाढत्या हल्ल्यांमुळे संघर्ष धोकादायक टप्प्यात 

दरम्यान, अमेरिकेने मध्यपूर्वेतील सुरक्षा परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा इशारा देत आपल्या नागरिकांना या प्रदेशात प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे हा संघर्ष आता अधिक व्यापक आणि धोकादायक टप्प्यात पोहोचल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

हेही वाचा
सर्व पहा