पुतण्याला वाचवण्यासाठी काकाने नदीत उडी घेत ७ मिनिटे झुंज दिली. उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर.

बहराइच : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथे एका १२ वर्षीय मुलाला मगरीने जिवंत गिळले. शेतात भातलावणीचे काम आटोपून नदीवर हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या या मुलावर मगरीने अचानक हल्ला केला आणि त्याला जबड्यात पकडून ओढत नेले. मुलाने स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.
मुलाचे काका आणि स्थानिक ग्रामस्थांनी विटा-दगड फेकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र मगरीने त्याला सोडले नाही. मगरीने दोन-तीन वेळा मुलाला हवेत उडवून पाण्यात आपटले आणि नंतर खोल पाण्यात ओढून नेले. बघता-बघता मगरीने मुलाचा अर्धा देह खाऊन टाकला. सुमारे ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ग्रामस्थांना मुलाचा मृतदेह सापडला.
ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली असली तरी, या थरारक घटनेचा व्हिडिओ शुक्रवारी सकाळी समोर आला आहे. बौंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी टी. एन. मौर्य यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी साकिब अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मगरीने मुलाचा उजवा पाय आणि कमरेखालचा भाग खाल्ला आहे. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून २८ किमी अंतरावर असलेल्या टिकुरी गावात घडली.
आई-वडिलांचे छत्र हरपले होते; काकांसोबत राहायचा सुनील
सुनील हा टिकुरी गावचा रहिवासी होता. त्याच्या आई-वडिलांचे आधीच निधन झाले होते. ५ वर्षांपूर्वी वडिलांचे, तर ७ वर्षांपूर्वी आईचे आजाराने निधन झाले. चार भावंडांमध्ये सुनील दुसऱ्या क्रमांकाचा होता. मोठी बहीण सुमन (१४), लहान भाऊ संजय (१०) आणि सर्वात धाकटी बहीण सीमा (७) असे त्याचे कुटुंब आहे. इतर भावंडे शाळेत जातात, पण सुनीलने शाळा सोडली होती. आई-वडिलांच्या निधनानंतर तो आपले काका विजय राज सिंह यांच्याकडे राहत होता.
हात-पाय धुताना मगरीने ओढले
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास सुनील त्याचे काका विजय राज सिंह यांच्यासोबत शेतात भातलावणीसाठी गेला होता. ३-४ तास काम केल्यानंतर संध्याकाळी घरी परतताना दोघेही घाघरा नदीत हात-पाय धूत होते. याच वेळी अचानक मगरीने पाण्याबाहेर येऊन सुनीलवर हल्ला केला. हे पाहून काका घाबरले; त्यांनी आरडाओरड करत आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले. ग्रामस्थांनी त्याला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मगर त्याला घेऊन गेलीच.
अंधारात टॉर्चच्या प्रकाशात शोधमोहीम
घाघरा नदीचा प्रवाह वेगवान असल्याने ग्रामस्थांनी बांबूच्या साह्याने सुमारे ५०० मीटरपर्यंत नदीत शोध सुरू केला. दोन तासांनंतर अंधार पडला तरी टॉर्चच्या प्रकाशात शोधमोहीम सुरूच होती. रात्री १० च्या सुमारास, घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला. मगरीच्या हल्ल्यामुळे मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत होता. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.
७ मिनिटे झुंज देऊनही पुतण्याला वाचवू शकलो नाही: काका
काका विजय राज सिंह यांनी रडत सांगितले, पुतण्याला वाचवण्यासाठी मी नदीत उडी घेतली आणि त्याचा हात पकडला. सुमारे सात मिनिटे मी त्याला मगरीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. पण मगर त्याला खोल पाण्यात खेचून घेऊन गेली. एक तासानंतर त्याचा मृतदेह दिसला, पण तोपर्यंत मगरीने त्याचा पाय आणि पोट खाल्ले होते.