Home >> ताज्या बातम्या >> डिजिटल अरेस्टप्रकरणी गोव्यासह देशभरात ईडीचे २० ठिकाणी छापे

डिजिटल अरेस्टप्रकरणी गोव्यासह देशभरात ईडीचे २० ठिकाणी छापे

१५ जणांची चौकशी : रोख रक्कम, सोने, विदेशी चलन जप्त

Story: प्रसाद शेट काणकोणकर |
5 hours ago
डिजिटल अरेस्टप्रकरणी गोव्यासह देशभरात ईडीचे २० ठिकाणी छापे


गोवन वार्ता
पणजी : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने डिजिटल अरेस्ट प्रकरणात गोव्यात दोन ठिकाणांसह दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे एकूण २० ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणातील हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम दुबई व इतर आखाती देशांत पाठविल्याचे उघड झाले आहे. सुमारे दोन कोटी रुपयांची रोख रक्कम, विदेशी चलन, सोने, इलेक्ट्रॅानिक डिव्हाईसेस, मालमत्तेच्या कागदपत्रांसह इतर दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. यात सुमारे १५ जणांची चौकशी सुरू असून ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने ९ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, सासष्टीतील एका महिलेने तक्रार दाखल केली होती. तिची आणि तिच्या पतीची डिजिटल अरेस्टद्वारे २ कोटी ६० लाख ३३ हजार ६३४ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. तक्रारदार महिलेला २० मे २०२५ रोजी सकाळी ९०४४३८५१८२ या क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. रजित सिन्हा असे स्वतःचे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) अधिकारी असल्याचे सांगून एका मोबाईल क्रमांकाची पडताळणी केली. तिने सदर मोबाईल क्रमांक तिचा नसल्याचे सांगितले. सकाळी ८.३० वा. ९६७९७२२७६९ या क्रमांकावरून संपर्क करून तिची खासगी माहिती मागितली. तिच्या पतीला ८१४३८९०९१० या क्रमांकावरून संपर्क केला. दोघांची एकत्र व्हिडिओ काॅन्फरन्स बैठक घेतली. सदर व्यक्तीने स्वतःची ओळख केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी अशी करून दिली. जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्याशी काय संबंध आहे, असे विचारले. तिने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले. सदर व्यक्तीने गोयलने मुंबईतील कॅनेरा बँकेत महिलेच्या नावाने खाते उघडून त्यात ६ कोटी रुपये जमा केल्याचे सांगितले. सदर रक्कम मनी लाँड्रिंगशी संबंधित असल्याचे सांगून दोघांवर ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे दबाव टाकला. दोघांना व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे २४ तास नजरेखाली ठेवले. संशयितांनी प्रकरण मिटविण्यासाठी २० मे २०२५ ते २ जून २०२५ या काळात विविध बँक खात्यांत २ कोटी ६० लाख ३३ हजार ६३४ रुपये जमा करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचे स्पष्ट
गोवा विभागाच्या ईडीने केलेल्या प्राथमिक चौकशीत या प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचे, तसेच उकळलेली रक्कम दुबई व इतर आखाती देशांत पाठवल्याचे दिसून आले. ईडीने शुक्रवारी पहाटेपासून गोव्यात दोन ठिकाणांसह दिल्ली, मुंबई आणि कोलकता येथे मिळून २० ठिकाणी छापे टाकले. यावेळी ८० लाख रुपयांची रोख रक्कम, १.२४ कोटींचे विदेशी चलन, १.३१ कोटी रुपये किमतीचे सोने, १४ कोटी रुपये किमतीची मालमत्ता, सुमारे १०० विविध बनावट कंपनीचे रब्बर स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत. पैसे वळविण्यासाठी वापरलेली ४०० हून अधिक बँक खाते गोठविण्यात आली आहेत. सुमारे १५ जणांची चौकशी सुरू असून कारवाई शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.