आषाढी एकादशीला अवघे आठ दिवस उरले असल्याने पंढरपुरात लगबग सुरू आहे. पंढरपूर प्रशासन सज्ज.

पणजी : आषाढी एकादशीला आता अवघे आठ दिवस उरले असून. महाराष्ट्रातील पंढरपुरात लाखो भाविकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो वारकरी पंढरपूर नगरीत दाखल होत असून, गोव्यातून काही दिवसांपूर्वी पायी निघालेले गोवेकर वारकरी देखील पुढील दोन दिवसांत पंढरीत पोहोचणार आहेत.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासनासह स्थानिक प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, पार्किंग आणि भाविकांसाठीच्या मूलभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. वारी दरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून जागोजागी तात्पुरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची सोय आणि विश्रामगृहे उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांतील दिंड्या आधीच पंढरपूरच्या वेशीवर पोहोचल्या आहेत.
८०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा असलेल्या या पंढरपूर वारीमध्ये दरवर्षी लाखो वारकरी अनवाणी येतात. विठ्ठल नामाचा जयघोष आणि ज्ञानोबा-तुकारामांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे. पंढरपुरात पोहोचल्यानंतर सर्व वारकरी सर्वप्रथम पवित्र चंद्रभागा नदीत स्नान करतात आणि त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन आपल्या वारीची सांगता करतात.