Home >> देश -परदेश >> २० वर्षांनंतर जॅकपॉट लागले; नशीब पालटले, मात्र आईने लॉटरीचे तिकीट चक्क कचऱ्यात फेकले

२० वर्षांनंतर जॅकपॉट लागले; नशीब पालटले, मात्र आईने लॉटरीचे तिकीट चक्क कचऱ्यात फेकले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 mins ago
२० वर्षांनंतर जॅकपॉट लागले; नशीब पालटले, मात्र आईने लॉटरीचे तिकीट चक्क कचऱ्यात फेकले

लंडन: नशीब कधी आणि कसे पालटेल याचा नेम नाही. अनेकदा माणसाच्या हातातोंडाशी आलेली मोठी संधी एका छोट्याशा चुकीमुळे हिरावली जाते. अशीच डोके सुन्न करणारी अजब घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. येथे एका महिलेला तब्बल १५३ कोटी रुपयांची (१२ मिलियन पाउंड) लॉटरी लागली. मात्र, कोट्यधीश झालेली ही महिला अवघ्या काही तासांतच पुन्हा गरीब झाली; कारण तिच्या आईने ते जॅकपॉटचे तिकीट कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते.

२० वर्षांनंतर पालटले होते नशीब

ब्रिटनमधील साऊथ वेल्स येथील रहिवासी असलेली कॅथ मेन एका रग्बी क्लबमध्ये ट्रेझरर म्हणून काम करते. कॅथला गेल्या २० वर्षांपासून लॉटरीचे तिकीट खरेदी करण्याचा छंद होता. ती नेहमी आपल्या आईच्या (फिओना) नावाने तिकीट खरेदी करायची. तिचा '६' या अंकावर प्रचंड विश्वास होता, त्यामुळे ती नेहमी ६ क्रमांकाशी जुळणारे तिकीट घ्यायची. ६ जून रोजी या लॉटरीचा ड्रॉ निघाला, मात्र बऱ्याच वेळ कोणीच या बक्षिसावर दावा केला नाही. अखेर कॅथने स्वतः तिकिटाचा नंबर तपासला.

लॉटरी जिंकल्याचे समजताच आनंद गगनात मावेना, पण...

कॅथने जेव्हा अधिकृत नंबरची पडताळणी केली, तेव्हा तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ती चक्क जॅकपॉट जिंकली होती. आनंदाच्या भरात तिने लगेचच आपल्या आईला फोन केला आणि लॉटरी लागल्याची खूशखबर दिली. मात्र, पुढील क्षणी आईने जे सांगितले ते ऐकून कॅथच्या पायाखालची जमीनच सरकली.

आईने तिकीट कचऱ्यात का फेकले?

झाले असे की, कॅथची आई फिओना हे तिकीट तपासण्यासाठी एका लॉटरी सेंटरवर गेली होती. तेथील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये तिकीट स्कॅन केले असता, मशीनने कोणताही अलर्ट किंवा सिग्नल दिला नाही. ब्रिटनमध्ये लॉटरीवर एक विशेष कोड असतो, जो स्कॅन झाल्यावर विजेती रक्कम दाखवतो. पण, त्या दिवशी मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे काहीच संदेश आला नाही. त्यामुळे तिकीट निरुपयोगी आहे असे समजून आईने ते थेट कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले.

कंपनीकडून ३० दिवसांची मुदत

हे ऐकताच कॅथ धावत लॉटरी सेंटरवर गेली. तिने लॉटरी ऑपरेटर कंपनी 'ऑलविन' (Allwyn) शी संपर्क साधला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. कंपनीने तिच्यावर विश्वास ठेवत तपास सुरू केला. मात्र, त्या लॉटरी सेंटरच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. तसेच दुकानातील कचरा आधीच कचरा डेपोमध्ये वाहून नेण्यात आला होता. दुकान मालक करण कुमार याने सांगितले की, स्कॅनिंग मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे हा गोंधळ झाला असावा.

लॉटरी कंपनीने कॅथची सर्व हकीकत ऐकून घेतली असून तिला दिलासा दिला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी कंपनीने ३0 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता आपल्या हक्काचे १५३ कोटी रुपये मिळवण्यासाठी कॅथला ३० दिवस चातकासारखी वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा