विठ्ठलवाडी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात विविध कार्यक्रम

म्हापसा : आषाढी महाएकादशीची चाहूल लागताच प्रत्येक भाविक माऊलीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागते. मात्र, विविध कारणांमुळे प्रत्येकाला प्रत्यक्ष पंढरपूर वारीत सहभागी होता येत नाही. अशा भाविकांसाठी क्षेत्र विठ्ठलवाडी, म्हापसा येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान समितीच्या वतीने आषाढी महाएकादशी निमित्त शनिवार, दि. २५ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता 'वारी माझ्या पांडुरंगाची' या वारीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी दिली.
पत्रकार परिषदेला सचिव परेश नाटेकर, माजी अध्यक्ष धाकुली शिरोडकर, शतकोत्सव समितीचे कार्याध्यक्ष उर्वेश नाटेकर, मुखत्यार सूरज डांगी, खजिनदार प्रसाद कवळेकर, उपाध्यक्ष श्रेयस कवळेकर, उपसचिव राहुल शिरोडकर यांची उपस्थिती होती.
अध्यक्ष टोपले यांनी ‘वारी माझ्या पांडुरंगाची’ या वारी संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, टाळ-मृदुंगाचा गजर करीत ज्ञानोबा तुकाराम, जय जय विठ्ठल रखुमाईच्या गजरात म्हापसा परिसरात भक्तिरसाचा अविष्कार या वारीमध्ये होईल.
यंदापासून वारीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी असणार अाहे. सर्व विठ्ठल भक्तांनी पहाटे ५.३० वाजता एकत्र येऊन सकाळी ६ वाजता श्री विठ्ठल रखुमाईच्या रथाची पूजा करून वारीला मंदिराकडून प्रारंभ होईल. वारीचा मार्ग मंदिराकडून मिनिझिस फार्मसी, मारुती मंदिर, गांधी चौक, खोर्ली सीम पोलीस स्टेशनच्या मागच्या रस्त्यातून विठ्ठलवाडीत प्रवेश करून पुन्हा मंदिराकडे येणार अाहे.
या वारीमध्ये विठ्ठल भक्तांनी अापल्या लहान माऊलींना विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत घेऊन यावे, जेणेकरून भक्तीचा अाविष्कार घडेल.
अाषाढी एकादशी निमित्त यंदा मंदिराला फुलांची अारास करण्यात येणार अाहे. यानिमित्त सकाळी ७ वाजता लघुरुद्र, महाअभिषेक, महापूजा, महाअारती होईल. त्यानंतर सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत सुहासिनींतर्फे श्री विठ्ठल रखुमाईच्या मुख्य मूर्तीवर स्वहस्ते अभिषेक सेवा होईल. संध्याकाळी ५ वा. सामूहिक गाऱ्हाणे घातल्यानंतर भजनी सप्ताहास प्रारंभ होईल. रात्री ११ वा. महाअारती होईल.
मंदिराने मागच्या १०० वर्षांपासून एकोपा ठेवला अाहे. मंदिर समिती नेहमी सर्व जातीच्या हिंदू समाजाला पुढे घेवून जात अाहे. मंदिर समितीने महिला, युवा व ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने उत्सव यशस्वी करून अापली शक्ती व एकोपा व एकसंघाची दर्शन घडविले.
मंदिर समिती दरवर्षी अारोग्य शिबिर, रांगोळी प्रशिक्षण, नेत्र तपासणी शिबिराचे अायोजन करते. तसेच रांगोळी, अाकाश कंदिल स्पर्धेसाठी विठ्ठलवाडी यूथ असोसिएशनला नेहमी सहकार्य करून अापली सामाजिक जबाबदारी पार पाडते, असे अध्यक्ष तुषार टोपले यांनी सांगितले.
नोव्हेंबरमध्ये भागवत सप्ताह
भागवत सप्ताह येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच महारुद्र, अनुष्ठान आणि विठ्ठल मेळ्याच्या आयोजनासंदर्भात गोव्यातील विठ्ठल मंदिर व वारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकदिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती टोपले यांनी दिली.