विजय सरदेसाई : अनिवासी गोवेकरांना विशेष दर्जा देऊ

आमदार विजय सरदेसाई यांचे स्वागत करताना कार्यकर्ते.
गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव : परदेशात राहणारे गोवेकर मातृभूमीशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत. त्यांच्या आणि गोव्यात राहणाऱ्या गोवेकरांच्या चिंता यामध्ये कोणताही फरक नाही. गोवा फॉरवर्डच्या नेतृत्वाखालील सरकार अनिवासी गोवेकरांसोबतचे संबंध घट्ट करेल. त्यांना विशेष दर्जा देण्यासाठी काम करेल. दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लढा सुरूच ठेवेल, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केले.
आमदार सरदेसाई शनिवारी युनायटेड किंगडम दौऱ्यावरून परतले. तेथे त्यांनी अनिवासी गोवेकरांशी संवाद साधला आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. गोव्यात त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. परदेशातील गोवेकर परके नाहीत. गोव्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असूनही सरकारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली. गोव्याचा लिलाव केला जात असल्याची भीती अनिवासी गोवेकरांमध्ये आहे. त्यांना बदल हवा आहे, असे आमदार सरदेसाई यावेळी म्हणाले.