अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी : डिचोलीत आत्माराम गावकर यांचा गौरव

आत्माराम गावकर आणि नीरजा गावकर यांचा सन्मान करताना अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी. सोबत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, सुषमा नार्वेकर, संजय नार्वेकर, डॉ. स्नेहा प्रभू म्हांबरे व इतर.
गोवन वार्ता प्रतिनिधी
डिचोली : भारत प्राचीन काळापासून ज्ञान, शिक्षण आणि साहित्याची भूमी आहे. ज्येष्ठ साहित्यिक आत्माराम गावकर यांनी एका वर्षात १०३ पुस्तके लिहून प्रकाशित करण्याचा विश्वविक्रम करून प्रेरणादायी कार्य केले आहे. हे यश कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, चिंतन आणि तपश्चर्येचे फलित आहे, असे गौरवोद्गार सिद्धगिरी मठ, कणेरी-कोल्हापूरचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी काढले.
शिक्षा व्हिजन, डिचोली आणि वा प्रकाशन डिचोली यांच्या संयुक्त विद्यमाने झांट्ये सभागृहात आयोजित आत्माराम गावकर यांच्या विश्वविक्रम गौरव सोहळ्यात ते आशीर्वचन देत होते. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या मुख्य संस्थापक तथा मुख्य संपादक सुषमा नार्वेकर, मार्केटिंग हेड संजय नार्वेकर, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. स्नेहा प्रभू म्हांबरे, प्रकाशक निरजा गावकर, डॉ. प्रवीण सावंत, गोविंद भगत, निळू गावकर आदी उपस्थित होते. स्वामींच्या हस्ते आत्माराम आणि निरजा गावकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. सुषमा नार्वेकर यांनी वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियात नोंद झालेल्या विश्वविक्रमाची घोषणा केली व प्रशस्तिपत्रक बहाल केले.
अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी पुढे म्हणाले की, भारताची शिक्षणव्यवस्था आणि साहित्यपरंपरा जगासाठी आदर्श राहिली आहे. शिक्षण हे मन, विचार आणि चारित्र्य घडविणारे माध्यम आहे. आत्माराम गावकर यांनी सहज आकलन होईल अशा पद्धतीने लेखन करून शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. डॉ. स्नेहा प्रभू म्हांबरे यांनी आत्माराम गावकर यांच्या साहित्याचा आढावा घेतला. सुषमा नार्वेकर म्हणाल्या, आत्माराम गावकर यांनी एका वर्षात १०३ पुस्तके लिहून प्रकाशित करण्याचा, तसेच कु. नीरजा आत्माराम गावकर यांनी सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करून स्वतंत्र विश्वविक्रमाची नोंद केली आहे. आत्माराम गावकर यांनी हा सन्मान कुटुंबीय, सहकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमी यांच्या सहकार्याचे फळ असल्याचे सांगितले. डॉ. प्रवीण सावंत यांनी स्वागत केले. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले. सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आत्माराम गावकर यांचा विश्वविक्रम डिचोली, गोवा आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यास आणि सेवाभावातून हे यश साकार झाले आहे. १०३ पुस्तके म्हणजे एक समृद्ध वाचनालयच असून सुमारे तीस तासांत एक पुस्तक पूर्ण करण्याचा हा अनोखा विक्रम आहे. या साहित्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना होणार आहे.
_ डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार, डिचोली