Home >> ताज्या बातम्या >> राज्यात पावसाचा जोर कायम; धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

राज्यात पावसाचा जोर कायम; धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

साळावली ६२ टक्के, गवाणे ७७ टक्के भरले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th July, 11:50 pm
राज्यात पावसाचा जोर कायम; धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

पणजी : राज्यात शनिवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असून, डिचोली, सत्तरी आणि सांगे तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. काही ठिकाणी पावसामुळे नुकसानीच्या घटनाही घडल्या. गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी १.०५ इंच पाऊस पडला असून, १ जून ते १८ जुलै या कालावधीत एकूण ३८.६९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३६ टक्क्यांनी कमी असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. साळावली धरण ६२ टक्के भरले असून, गवाणे धरणात १८ जुलै अखेरीस सर्वाधिक ७७ टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय आमठाणे ६८ टक्के, तिळारी ५९ टक्के, चापोली ५५ टक्के, पंचवाडी ४९ टक्के आणि अंजुणे धरण ३४ टक्के भरले आहे.
तापमानात घट; सहा दिवस पावसाचा अंदाज
पावसामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानातही घट झाली आहे. शनिवारी पणजीत कमाल ३१.४ अंश, तर किमान २५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने पुढील सहा दिवस राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला असून, २१ जुलैपर्यंत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश आणि किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
काणकोणमध्ये पावसाचे अर्धशतक
राज्यात १ जून ते १८ जुलै दरम्यान काणकोण केंद्रात सर्वाधिक ५१.१३ इंच पावसाची नोंद झाली आहे. धारबांदोडा येथे ४८.१८ इंच, सांगेमध्ये ४८.१७ इंच, वाळपईमध्ये ४३.४२ इंच, केपेत ४३.१३ इंच मडगावमध्ये ४१.७९ इंच, फोंडामध्ये ४१.३४ इंच, साखळीत ४०.२४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणेमध्ये ३४.१६ इंच, जुने गोवा मध्ये ३२.९७ इंच, मुरगावामध्ये ३०.९७ इंच, दाबोळीमध्ये ३०.४२ इंच म्हापसामध्ये ३०.३१ इंच, तर पणजीमध्ये २६.२१ इंच पावसाची नोंद झाली आहे.