Home >> गोवा >> आंबेडे-नगरगाव येथील रखडलेल्या धोकादायक रस्त्याची दुरुस्ती

आंबेडे-नगरगाव येथील रखडलेल्या धोकादायक रस्त्याची दुरुस्ती

बातमीची तातडीने दखल : दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी


19th July, 08:45 pm
आंबेडे-नगरगाव येथील रखडलेल्या धोकादायक रस्त्याची दुरुस्ती

गोवन वार्ता प्रतिनिधी
वाळपई : नगरगाव पंचायत क्षेत्रातील आंबेडे येथील श्री हनुमान मंदिरासमोर रखडलेल्या धोकादायक जोड रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. दै. ‘गोवन वार्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने दखल घेण्यात आली. यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करून अशा प्रकारची दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रस्त्याची बिकट झालेली अवस्था.
नगरगाव पंचायत क्षेत्रातील आंबेडे येथे नव्या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र पुलाला जोडणारा संपर्क रस्ता अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेतच होता. रस्त्यावर खडी व दगड टाकले होते; परंतु त्यानंतर आवश्यक काम पूर्ण करण्यात आले नव्हते. त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना अथवा इशारा फलक उभारले नव्हते. परिणामी नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः दुचाकी चालकांना मोठा धोका निर्माण झाला होता. चारचाकी चालकांनाही वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या पलीकडील सुमारे ४० घरांतील नागरिकांना दररोज या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत होता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आजारी व्यक्तींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

वर्तमानपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ताबडतोब दुरुस्ती करण्यात आली.
स्थानिकांनी संबंधित कंत्राटदाराला प्रत्यक्ष भेटून काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर ही बाब पत्रकारांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या संदर्भातील वृत्त दै. ‘गोवन वार्ता’मध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाले. वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खात्याने गंभीर दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर एका दिवसात संपर्क रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक केले.
साबांखाच्या सूचनांकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित कंत्राटदाराला यापूर्वीही अनेक वेळा काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागला. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा कठोर निर्देश देण्यात आले आणि त्यानंतर हे काम तातडीने पूर्ण करण्यात आले.
वेळेत काम पूर्ण न करणाऱ्यावर कारवाई करा
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, सरकारी निधीतून जनतेच्या सोयीसाठी उभारण्यात येणारी विकासकामे ही नागरिकांच्या अडचणीचे कारण ठरू नयेत. एखादे काम सुरू करून ते अनेक दिवस अर्धवट अवस्थेत ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा प्रकारामुळे शासनाच्या विकासकामांविषयी नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होते. त्यामुळे वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या तसेच वारंवार दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.