कचऱ्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक : नवी जलवाहिनी घालण्याची मागणी

फोंडा : बोरी पंचायतीची ग्रामसभा रविवारी पाणी आणि कचऱ्याच्या प्रश्नावरून गाजली. शिरशिरे, डब, करसंगे, आफ्रामेत व अन्य भागात पाण्याची समस्या कायम असल्याने ग्रामसभेत काही वेळ तणाव निर्माण झाला. ‘हर घर जल’ ऐवजी बोरी परिसरात पाण्यासाठी ‘हर घर छळ’ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
सरपंच सागर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत डब गावात पाण्याची वाहिनी घालण्यापूर्वी बूस्टर पंप बसविल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला. बायथाखोल ते शिरशिरेपर्यंत नवीन पाण्याची वाहिनी घालून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा ठराव ग्रामस्थांनी घेतला आहे.
बोरी पंचायत क्षेत्रातील शिरशिरे परिसरातील लोकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या १-२ महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न असल्याने स्थानिक लोकांनी रविवारी झालेल्या ग्रामसभेत आक्रमक पावित्रा घेतला. गावातील लोकांना पाणी पुरवठा सुरळीत होत नसताना बांधकाम खात्याने डब गावात पाण्याची वाहिनी नसताना बूस्टर पंप बसविला. बूस्टर पंपचे उद्घाटन शनिवारी पेयजल पुरवठा खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. त्यामुळे गेल्या १-२ महिन्यांत पाण्यासाठी आवाज उठविणाऱ्या लोकांची भेट घेण्याऐवजी मंत्री बूस्टर पंपच्या उद्घाटनसाठी आल्याने ग्रामस्थानी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर पाणी पुरवठा होत नसलेल्या लोकांनी आवाज उठविल्यानंतर एका पंच सदस्याने सोशल मीडियावर ग्रामस्थांवर टीका केली. त्यामुळे ग्रामस्थांनी सर्व पंच सदस्यांच्या घरातील नळाची जोडणी १५ दिवस बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे पाण्यासाठी कसे हाल होतात, याचा प्रत्यय त्या पंचाला येणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
प्रदीप बोरकर म्हणाले, बोरी पंचायत क्षेत्रात पाण्यासाठी राजकारण होत आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर असताना एक दिवस सुद्धा स्थानिक आमदाराने विचारपूस केली नाही. मात्र, पाण्याची वाहिनी अर्धवट असताना बसवलेल्या बूस्टर पंपचे उद्घाटन करण्यासाठी स्थानिक आमदार प्रकटले.
शिरशिरे भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. पाण्यासाठी स्थानिकांनी यापूर्वी काहीवेळा बांधकाम खात्याच्या कार्यालयात धडक देऊन विचारपूस केली हाती. मात्र, अजूनपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात अपयश आले. परिसरात नव्याने बांधलेल्या सर्व इमारतीच्या लोकांना पूर्णवेळ पाणी पुरवठा केला जातो, असे वंदेश गावडे यांनी सांगितले.
पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ३ ठिकाणी बूस्टर पंप बसविण्यात येणार आहे. सध्या एका ठिकाणी बूस्टर पंप बसवून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. बायथाखोल ते शिरशिरेपर्यंत नवीन पाण्याची वाहिनी घालून स्थानिक लोकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सरपंच सागर नाईक यांनी सांगितले.