बांबोळी, पणजी, चिखली आणि पेडण्यात अपघात!

पणजी: गोव्यात रविवारच्या सुट्टीच्या दिवशी अपघातांचे सत्र पाहायला मिळाले. राज्यातील बांबोळी, पणजी, चिखली आणि पेडणे अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात घडले. या अपघातांमध्ये काही ठिकाणी वाहनांचे अतोनात नुकसान झाले तसेच अनेक जण जखमी झालेत.
बांबोळी येथे चार वाहनांचा विचित्र अपघात
बांबोळी येथे चार वाहनांचा एकमेकांना धडक बसून एक अत्यंत विचित्र अपघात घडला. नियाज रेस्टॉरंटजवळ घडलेल्या या अपघातात एक आय२० कार पलटी होऊन थेट दुसऱ्या महिंद्रा कारच्या छतावर पडली. या विचित्र अपघातात आणखी दोन वाहनांचेही नुकसान झाले आहे. अपघातातील जीवितहानी किंवा जखमींबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातास कारणीभूत असलेली स्कॉर्पिओ गाडी अत्यंत निष्काळजीपणे आणि वेडीवाकडी चालवली जात होती. रस्त्यावरील इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात दुभाजकाला धडक दिली.
त्यात गाडी फिरली. याच दरम्यान मागे असलेल्या महिंद्रा एसयूव्हीने ब्रेक लावला. त्याच्या मागे असलेल्या i२० कार धडक देत एसयूव्हीवर पलटी झाली. जुने गोवा पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाला ताब्यात घेतले असून, जखमींवर उपचार सुरू.
पणजीमध्ये भरधाव कारची स्कूटरला धडक; चालक जखमी
राजधानी पणजी येथील कदंब बसस्थानकासमोरील आंबेडकर उद्यान परिसरात आज सकाळी दुसरा भीषण अपघात घडला. मध्यप्रदेश पासिंगच्या एका भरधाव कारने स्कूटरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कूटरला उडवल्यानंतर कार थेट आंबेडकर उद्यान परिसराचे कुंपण तोडून आत घुसली. या अपघातात स्कूटर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पणजी पोलिसांनी कार चालवणाऱ्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
चिखलीत 'आस्मा बार' जंक्शनजवळ ४ वाहने भिडली; लाखो रुपयांचे नुकसान
चिखली येथील आस्मा बार जंक्शनजवळ चार वाहनांचा समावेश असलेला आणखी एक अपघात नोंदवला गेला. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, परंतु वाहनांच्या धडकेमुळे लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक रहिवाशांनी रस्ते सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अभियंत्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याची तातडीने पाहणी करून योग्य त्या सुधारणा कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
जैतीर-पेडणे येथे कारचा स्वयंअपघात
पेडणे तालुक्यातील जैतीर-उगवे येथे वाहन चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने एक स्वयंअपघात झाला. या अपघातात कारच्या दर्शनी (पुढील) भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळी गाडीत काही युवक प्रवास करत होते, सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही व सर्व जण सुरक्षित आहेत. गोव्यातील वाढत्या रस्ते अपघातांमुळे वाहन चालवताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
दरम्यान म्हापसा येथील डांगी कॉलनीत निर्माणाधीन इमारतीचा सज्जा कोसळून ६ कामगार जखमी झाले. जखमींवर गोमेकॉत प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.