Home >> ताज्या बातम्या >> पावसाचा वेग मंदावला; आतापर्यंत ३७ टक्के तूट

पावसाचा वेग मंदावला; आतापर्यंत ३७ टक्के तूट

पुढील तीन दिवसांतही पावसाचे प्रमाण कमीच


18 hours ago
पावसाचा वेग मंदावला; आतापर्यंत ३७ टक्के तूट

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी पुन्हा सुरू झालेल्या पावसाने आता पुन्हा उघडीप दिली आहे. शनिवार आणि रविवारी राज्यात अत्यल्प पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील पावसाची तूट पुन्हा वाढून ३७ टक्क्यांवर पोहोचली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांतही पावसाचे प्रमाण कमीच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी केवळ ६.१ मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात आतापर्यंत राज्यात सरासरी ३८.९३ इंच (९८९ मिमी) पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा ३७ टक्के कमी आहे. यंदा मान्सून राज्यात वेळेत दाखल झाला. मात्र, आगमनानंतर अपेक्षित पाऊस झाला नाही. २२ जूनपासून पावसाला सुरुवात झाली, आठवडाभर चांगला पाऊस झाल्यानंतर त्याने पुन्हा विश्रांती घेतली. जुलै महिन्यातही दोन-तीन दिवस पाऊस पडून नंतर पुन्हा दडी मारल्याचे चित्र दिसून आले.
काणकोण, धारबांदोडा, केपे, सांगे, मडगाव आणि वाळपई या भागांत काही प्रमाणात पाऊस झाला असला, तरी पणजी, म्हापसा आणि पेडणे परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. उत्तर गोव्यात वाळपई आणि साखळी वगळता बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दरम्यान, काणकोण आणि धारबांदोडा या तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. काणकोणमध्ये आतापर्यंत ५१ इंच, तर धारबांदोड्यात ५० इंच पावसाची नोंद झाली आहे.