रेती व्यावसायिकांची मागणी : कार्यवाहीसाठी १ ऑगस्टपर्यंतची मुदत

रेती व्यावसायिकांसोबत ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्टी, उत्कर्ष तेली, पंच दर्शन, मधुकर पालयेकर व इतर.
गोवन वार्ता विशेष प्रतिनिधी
पेडणे : तालुक्यातील तेरेखोल नदीतील रेती व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली नाही, तर २ ऑगस्टपासून सिंधुदुर्गातून येणाऱ्या रेतीवाहू गाड्या अडवल्या जातील, असा इशारा पेडणे येथल रेती व्यावसायिक आणि ट्रकमालक संघटनेने दिला आहे.
तालुक्यातील रेती व्यावसायिक, ट्रक व्यावसायिक व संबंधित घटकांनी येथील श्री भगवती देवीचे दर्शन घेऊन पेडणेतील तेरेखोल नदीत स्थानिक रेती व्यवसाय पुन्हा सुरू होण्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत रेती व्यावसायिक गंगाराम मठकर म्हणाले की, एक वर्षापासून स्थानिक रेती व्यवसाय बंद असल्यामुळे शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. अनेक व्यावसायिक आर्थिक अडचणीत असून ट्रकमालक, चालक, मजूर आणि व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून स्थानिक रेती व्यवसाय सुरू करावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात दररोज सुमारे ३०० ते ४०० ट्रक रेतीची वाहतूक केली जाते.
पंच दर्शन हळदणकर म्हणाले, की, सिंधुदुर्गातून दररोज शेकडो रेतीचे ट्रक गोव्यात येतात. तेरेखोल नदीतील स्थानिक रेती उपसा बंद करण्यात आल्याने अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन स्थानिक रेती व्यवसाय तातडीने सुरू करावा.
ट्रक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये म्हणाले की, स्थानिक रेती व्यवसाय बंद झाल्यामुळे ट्रक व्यावसायिकांचाही व्यवसाय ठप्प झाला आहे. सोमा मुळगावकर, रोहन केरकर यांनीही विचार मांडले.
मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा !
बैठकीत रेती व्यावसायिक आणि ट्रक व्यावसायिकांनी १ ऑगस्टपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर सिंधुदुर्गातून गोव्यात येणारी रेती रोखण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रश्नात लक्ष घालून स्थानिक रेती व्यावसायिकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.