Home >> ताज्या बातम्या >> लघु हॉटेल, रेस्टॉरंटसाठी परवान्याचे निकष शिथिल

लघु हॉटेल, रेस्टॉरंटसाठी परवान्याचे निकष शिथिल

पर्यटन व्यवसायांना दिलासा : प्रदूषण मंडळाकडून मोठी सूट


21st July, 11:26 pm
लघु हॉटेल, रेस्टॉरंटसाठी परवान्याचे निकष शिथिल

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : ज्या हॉटेल्स किंवा रिसॉर्टमध्ये २० किंवा त्यापेक्षा कमी खोल्या आहेत आणि ज्या रेस्टॉरंट किंवा धाब्यांमध्ये १०० किंवा त्यापेक्षा कमी ग्राहक बसण्याची क्षमता आहे, त्यांना आता ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाना घेण्याची आवश्यकता राहणार नाही. अशा आस्थापनांना केवळ ‘व्हाईट कॅटेगरी’मध्ये नोंदणी करावी लागणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) गोव्यासह सर्व राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांना या संदर्भात कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंटच्या वर्गीकरणासाठी (रेड, ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट) सुधारित निकषही जाहीर केले आहेत.
लहान हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंटना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन निकषांनुसार संबंधित आस्थापनांचे प्रदूषणाच्या संभाव्यतेनुसार वर्गीकरण करण्यात येणार आहे. जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ च्या कलम १८(१)(ब) अंतर्गत सीपीसीबीने हे आदेश जारी केले आहेत. २० किंवा त्यापेक्षा कमी खोल्यांची हॉटेल्स व रिसॉर्ट्स ‘व्हाईट कॅटेगरी’त नोंदविली जातील. अशा आस्थापनांना केवळ नोंदणी करणे पुरेसे असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाना घेण्याची गरज राहणार नाही. त्याचप्रमाणे १०० किंवा त्यापेक्षा कमी आसनक्षमतेची रेस्टॉरंट्स व धाबे यांनाही ‘व्हाईट कॅटेगरी’त नोंदणी करून परवान्यापासून सूट मिळणार आहे.
'ईज ऑफ डुइंग बिझनेस' (व्यवसाय सुलभीकरण) धोरणांतर्गत ही सवलत देण्यात आली असून त्याचा लाभ लहान व्यावसायिकांसह पर्यटन क्षेत्रालाही होणार आहे. ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवान्यातून सूट मिळाली असली तरी संबंधित हॉटेल्स आणि रेस्टॉरंटना काही अटींचे पालन करावे लागणार आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना घातलेल्या अटी
जनरेटर संच सीपीसीबीच्या मानकांनुसार असावा किंवा गॅसवर चालणारा असावा.
बॉयलर असल्यास तो गॅस किंवा विजेवर चालणारा असावा.
स्वयंपाकघरात ऑईल व ग्रीस ट्रॅपची व्यवस्था असावी.
सांडपाण्याची योग्य प्रक्रिया व व्यवस्थापन करणे बंधनकारक असेल.
१,००० चौ.मी.पर्यंतच्या लग्न हॉल, बुफेलाही सूट
१,००० चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या लग्न हॉल आणि बुफे सुविधा यांनाही ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवान्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यांची नोंदणी ‘व्हाईट कॅटेगरी’त केली जाईल. मात्र, जनरेटर, बॉयलर, ऑईल-ग्रीस ट्रॅप आणि सांडपाणी व्यवस्थापनासंबंधीच्या अटी त्यांनाही लागू राहतील.
हॉटेल्स, रिसॉर्ट्ससाठी नवीन वर्गीकरण
३०० पेक्षा जास्त खोल्या – रेड किंवा ऑरेंज गट (स्वयंपाकघरात प्रदूषणकारी इंधन नसल्यास ऑरेंज)
१०१ ते ३०० खोल्या – ऑरेंज गट
२१ ते १०० खोल्या – ऑरेंज (प्रदूषणकारी इंधन नसल्यास ग्रीन)
२० किंवा त्यापेक्षा कमी खोल्या – ग्रीन (प्रदूषणकारी इंधन नसल्यास व्हाईट)
रेस्टॉरंट्स/धाब्यांचे वर्गीकरण
२०० पेक्षा जास्त आसनक्षमता – ऑरेंज
१०१ ते २०० आसनक्षमता – ग्रीन
१०० पर्यंत आसनक्षमता – व्हाईट
लग्न हॉल/बुफे वर्गीकरण
२,५०० चौ.मी.पेक्षा अधिक – ऑरेंज
१,००० ते २,५०० चौ.मी. – ग्रीन
१,००० चौ.मी.पर्यंत – व्हाईट