नियमभंगाची नोंद सुरू; सरकारच्या आदेशानंतरच कारवाई

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : राज्यातील २६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित वाहतूक कॅमेऱ्यांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन सातत्याने नोंदवले जात असले, तरी सध्या वाहनचालकांना दंडाची नोटीस (तालांव) पाठविली जाणार नाही. सरकारकडून अंतिम आदेश मिळाल्यानंतरच दंडाची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वाहतूक संचालक अरविंद खुटकर यांनी दिली.
एआय कॅमेरे बसविण्याचा उद्देश केवळ दंड आकारणे नसून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे हा आहे. सध्या जागरूकतेवर भर दिला जात असून सरकारच्या आदेशानंतरच दंडाची अंमलबजावणी केली जाईल, असे खुटकर यांनी स्पष्ट केले.
एआय कॅमेरे सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत २५ हजारांहून अधिक वाहतूक नियमभंगाची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. राज्यात वाढत्या अपघातांवर आणि अपघाती मृत्यूंच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी हेल्मेट, सीटबेल्ट आणि इतर वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी सरकारने एआय कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात ९२ ठिकाणी एआय कॅमेरे बसविण्याचे नियोजन असून, सध्या २६ ठिकाणी ते कार्यान्वित आहेत. हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे अशा नियमभंगाची नोंद हे कॅमेरे स्वयंचलितपणे करतात. सरकारने १५ जुलैपासून दंड आकारणी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या हजारो नियमभंगांची नोंद होत असली तरी दंडाची नोटीस पाठविण्यात येत नाही.
एआय कॅमेरे बसवल्यानंतर वाहतूक खात्याने तपासणी केली असता अनेक वाहनधारकांनी वाहन विम्याचे नूतनीकरण केले नसल्याचे आढळून आले. वाहनधारकांना विमा नूतनीकरणासाठी मुदत देण्यात आली आहे. विमा नूतनीकरण केलेले नसले तरी सध्या दंड आकारला जाणार नाही, असे वाहतूकमंत्री माॅविन गुदिन्हो यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच दंड आकारणी
एआय कॅमेऱ्यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांना नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी सुरुवातीला दंड न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दंड आकारणीच्या प्रणालीत काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर झाल्यानंतरच दंड आकारणीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे वाहतूक संचालक अरविंद खुटकर यांनी स्पष्ट केले.