वादावादीनंतर स्थानिकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना

पणजी : आसगाव येथे पर्यटकांच्या एका गटाने स्थानिक नागरिकांवर एअरगन रोखून त्यांना मारहाण केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी सदर पर्यटकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटकांची एक भाड्याने घेतलेली महिंद्रा थार आसगाव येथे अचानक रस्त्यावरून घसरून एका गटारात अडकली. कार अडकलेली पाहून मदतीसाठी काही स्थानिक नागरिक तेथे धावून गेले. मात्र, त्याच वेळी 'थार' कारमधील पर्यटकांसोबत त्यांच्या काळ्या रंगाच्या एसयूव्ही मधून आलेल्या मित्रांनी स्थानिक नागरिकांशी विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केला. हा वाद इतका टोकाला गेला की, पर्यटकांच्या गटातील एकाने थेट एअरगन बाहेर काढली आणि एका स्थानिक व्यक्तीवर रोखले. या प्रकारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांना पर्यटकांनी एअरगनचा धाक दाखवल्याचे समजताच आसपासचे अनेक ग्रामस्थ घटनास्थळी जमले. त्यांनी पर्यटकांना पळून जाण्यापासून रोखले आणि हणजूण पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पर्यटकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या जवळील एअरगन जप्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीर तरल करत आहेत.