
मडगाव : येथील 'क्रिष्णी ज्वेलर्स'चे मालक स्वप्नील वाळके यांच्या हत्या प्रकरणातील संशयित इव्हेंडर रॉड्रिग्ज याला मोठा झटका बसला आहे. दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळून लावला आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये केवळ दीर्घकाळ कोठडीत असणे हा जामीन मिळण्याचा एकमेव आधार असू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदवले.
मुख्य कटात होता सहभाग
सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकारी पक्षाच्या युक्तिवादानुसार, संशयित इव्हेंडर रॉड्रिग्ज हा हत्येच्या मुख्य कटात थेट सामील होता. त्याने मुख्य संशयित मुस्तफा शेख याच्यासोबत बिहारला जाऊन गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणले होते.
सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे
२ सप्टेंबर २०२० रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. घटनेच्या दिवशी इव्हेंडर घटनास्थळी उपस्थित होता. स्वप्नील वाळके यांच्यासोबत झालेल्या झटापटीदरम्यान, इव्हेंडर हा मुख्य संशयित मुस्तफा शेख याला वाळके यांच्या तावडीतून सोडवून पळून जाण्यास मदत करत असल्याचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये स्पष्ट दिसले आहे. तसेच, संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
खटला अंतिम टप्प्यात; सुनावणी लवकरच
या संपूर्ण प्रकरणात एकूण ११३ साक्षीदार असून, आतापर्यंत १० मुख्य साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली आहे. सध्या मृत स्वप्नील वाळके यांच्या पत्नीची न्यायालयात साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. खटल्याची सुनावणी अत्यंत गतीने आणि प्रगतीपथावर असल्याने, या टप्प्यावर संशयिताला जामीन देणे योग्य नाही असे नमूद करत न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला.