Home >> देश -परदेश >> मोठी बातमी: नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

मोठी बातमी: नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मोठे यश; केंद्रीय शिक्षण खात्याच्या सचिवांची बदली. एनटीए मधील ४७ अधिकारी बडतर्फ!

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
मोठी बातमी: नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

नवी दिल्ली : देशभरात गाजत असलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटी आणि गैरप्रकार प्रकरणी अखेर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक, विविध विद्यार्थी संघटना आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून होत असलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकत सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याचे मानले जात आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.



या राजीनाम्यापूर्वी दिल्लीत अत्यंत जलद गतीने मोठ्या घडामोडी घडल्या. नीट परीक्षेतील धांदली समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. कॉकरोच जनता पार्टी आणि काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. विठ्ठलभाई पटेल हाऊस येथे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी कॉकरोच जनता पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान सीजेपीने शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम राहण्याचा इशारा दिला होता आणि कोणत्याही तडजोडीस नकार दिला होता. सुरुवातीला सरकारने राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली असली, तरी वाढता जनक्षोभ आणि विद्यार्थ्यांचा दबाव यामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पद सोडावे लागले आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबतच शिक्षण मंत्रालयाने आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. कालच शिक्षण मंत्रालयाच्या सचिवांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती, त्यानंतर आज एनटीएमधील तब्बल ४७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असा इशारा शिक्षण मंत्रालयाने दिला आहे. तसेच दिल्ली पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एका स्पेशल टास्क फोर्सची (STF) स्थापना करण्यात आली आहे.

एनटीएच्या या कारवाईवर कॉकरोच जनता पक्षाचे नेते अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 'एक्स' (ट्विटर) वर एका लहान माशाचा फोटो पोस्ट करत, ही कारवाई केवळ छोट्या कर्मचाऱ्यांवर करून मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा सूचक इशारा दिला होता. जोपर्यंत मूळ सूत्रधारांवर आणि मुख्य जबाबदार व्यक्तींवर कारवाई होत नाही आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच घडलेल्या घडामोडींमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा सादर केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची (NTA) संपूर्ण रचनाच बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. येत्या एका महिन्यात एजन्सीची कार्यप्रणाली, अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि अंतर्गत व्यवस्थापन पूर्णपणे नव्याने तयार केले जाईल. देशातील सर्व स्पर्धा परीक्षा अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडाव्यात यासाठी शिक्षण मंत्रालय रात्री महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.


हेही वाचा
सर्व पहा