साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

कुळे येथे बुडून तिघा भावांसह चौघांचा मृत्यू, मायणा-कुडतरी अत्याचार प्रकरणी पोलीस निलंबित

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
13th June, 11:43 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : कुळे येथील मेटावाडा भागात पुलाजवळील दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या वास्को परिसरातील तिघा भावांसह चौघांचा बुडून मृत्यू झाला. म्हापसा येथील सॅम्युअल या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाची अधीक्षकांनी चौकशी सुरू केली आहे. मायणा-कुडतरी पोलीस अत्याचार प्रकरणात काही पोलिसांना निलंबित करण्यात आले. याशिवाय अपघाती मृत्यू, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

दोघा वकिलांसह आठ जणांवर फातोर्डात गुन्हा नोंद

मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून मृत व्यक्तीची वडिलोपार्जित मालमत्ता हडपण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी दोघा वकिलांसह आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता विक्री झाल्याची तक्रार रॉयसन डिकॉस्टा आणि गॅली दिनिज (रा. माजोर्डा) यांनी फातोर्डा पोलिसांत दिली होती.

गोवा वेल्हा येथे इनोव्हाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

गोवा वेल्हा येथील बेनेटन स्टोअरजवळ इनोव्हा कार आणि होंडा अ‍ॅक्टिव्हा यांच्यात अपघात झाला. यात दुचाकी चालक रोम्यु फर्नांडिस (६३, भाटी-गोवा वेल्हा) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आगशी पोलिसांनी इनोव्हा कारचालक मोहम्मद शबीर शेख (२०, मोती डोंगर-मडगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हडफडेत झाड कोसळून ७ वाहनांचे नुकसान

हडफडे येथील रेन्टन रिसॉर्टजवळ रविवारी सायंकाळी भेंडीचे मोठे झाड कोसळले. या झाडाखाली सापडून सात कारचे जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले. झाड रेन्टन रिसॉर्टच्या वाहन पार्किंग स्थळी कोसळले. या जागी रिसॉर्टच्या ग्राहकांनी आपल्या गाड्या पार्क केल्या होत्या. त्यातील सात कार या झाडाखाली सापडल्या. त्यापैकी दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले.

सोमवार 


बांबोळी महामार्गावर कारची स्कूटरला धडक

बांबोळी येथील अॅथलेटिक स्टेडियमजवळ राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कार आणि दुचाकी अॅक्टिवा यांच्यात अपघात झाला. अपघातात दुचाकीचालक साल्वादोर द मूंद-पर्वरी येथील रेमेजिओ फर्नांडिस (७९) आणि त्यांच्या मागे बसलेल्या पाऊलिना फर्नांडिस (६५) या दाम्पत्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आगशी पोलिसांनी अपघाती मृत्यू दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

सॅम्युअल प्रकरणाची पोलीस अधीक्षकांकडून चौकशी

गावसावाडा, म्हापसा येथील सॅम्युअल गार्विन दी ब्रागांझा या २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाची पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्यामार्फत म्हापसा पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक कर्पे यांनी म्हापसा पोलीस स्थानकाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

अपहरण करून दोन युवकांना बेदम मारहाण; ४० हजारांची लूट

करंझाळे येथील समुद्र किनाऱ्यावरून ताळगाव येथील एका तरुणाचे आणि त्याच्या मित्राचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांना निर्जन स्थळी डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. संशयितांनी या दोन्ही तरुणांना चाकू आणि बाटल्यांचा धाक दाखवत बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून ४० हजार रुपयांची खंडणी उकळली.

मंगळवार 

कथित मारहाणप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

मायना कुडतरी पोलीस ठाण्याच्या परिसरात मारहाण करणे आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी गोवा पोलीस खात्याने पोलीस कॉन्स्टेबल चेतन कोळी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मायना कुडतरी पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रातील एका वादाच्या संदर्भात पोलीस ठाण्यात आलेल्या दोन गटांपैकी चार व्यक्तींना पोलीस कॉन्स्टेबल चेतन कोळी यांनी विनाकारण रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यांना पोलीस ठाण्याच्या परिसरातच मारहाण केली, असा आरोप कोळी यांच्यावर आहे.

मिकी पाशेकोंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

कॅसिनोमधील २००९ मधील मारहाण प्रकरण आणि २०२४ मधील सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधातील आंदोलनावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात माजी मंत्री मिकी पाशेको यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. याशिवाय वेलिंगकर प्रकरणात पाशेको यांच्यासह आणखी दोघाजणांवर आरोप निश्चितीचे आदेशही मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाने दिले आहेत.

दोन युवकांचे अपहरण; एका संशयिताला अटक

करंझाळे येथील समुद्र किनाऱ्यावरून एका तरुणाचे आणि त्याच्या मित्राचे भरदिवसा अपहरण करून त्यांना निर्जन स्थळी डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी दुसरा संशयित झाकीउल्ला काझी (करंझाळे) याला अटक केली आहे.

बनावट पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे मालमत्ता हडप प्रकरणी दोघांवर गुन्हा

बनावट स्वाक्षर्‍या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. आके मडगाव येथील अनंत लोटलीकर आणि त्यांची पत्नी सावित्री लोटलीकर यांनी याप्रकरणी फातोर्डा पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

बुधवार 

‘हवाई’ किनाऱ्यावर इंटर्न डॉक्टर युवतीचा मृतदेह सापडला

दोना पावला येथील समुद्रकिनाऱ्यावर बुधवारी सायंकाळी २३ वर्षीय इंटर्न डॉक्टर युवतीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पणजी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात पाठवला आहे.

मडगावातील खारेबांध रस्त्यावरील हॉटेलला आग

मडगाव येथील खारेबांध रस्त्यावरील हंस कॅफे या हॉटेल आस्थापनाला आग लागण्याची घटना बुधवारी रात्री घडली. मडगाव अग्निशामक दलाने वेळीच धाव येत आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेलमधील काही साहित्यासह इलेक्ट्रीक वायरिंगचेही नुकसान झाले आहे.

कारचा धक्का दुचाकीला बसल्यावरून शिवोलीत मारहाण

मार्ना शिवोली येथे रोडरेजवरून मुंबईतील एका व्यक्तीसह तिघांना मारहाण करून १० हजार रूपये खंडणी रक्कम उकळण्यासह कार व मोबाईलची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी पाच स्थानिक युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

बिर्ला-झुआरीनगर येथे आपल्या नातेवाईकाकडे आलेला अमृत पुंडलिक परमार हा १९ वर्षीय युवक आपल्या मित्रांसह बुधवारी दुपारी विहिरीत पोहण्यासाठी उतरल्यावर बुडाला. त्याचा मृतदेह विहिरीतील कचऱ्यामध्ये अडकल्याने तो बाहेर काढण्यासाठी बराच त्रास घ्यावा लागला. शेवटी सायंकाळी उशीरा त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात द्दष्टीच्या जीवरक्षकांना यश आले.

गुरुवार 

मायणा-कुडतरी पोलीस अत्याचार प्रकरणी दोन कॉन्स्टेबल निलंबित

मायणा-कुडतरी पोलीस अत्याचार प्रकरणात दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक शेखर एम. प्रभुदेसाई यांनी पुंडलिक परीट आणि समीर सुदीर या आणखी दोन पोलीस कॉन्स्टेबलना निलंबित केले आहे. या नव्या कारवाईमुळे या प्रकरणातील निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता तीनवर पोहोचली आहे.


नावेलीत आग लागून ३० हजारांचे नुकसान

वार्का येथे मोठे वडाचे झाड कोसळल्याने इको गाडीचे सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले. याशिवाय नावेली येथे घराला आग लागण्याची घटना घडली, यात सुमारे ३० हजारांचे नुकसान झाले तर १ लाखाची मालमत्ता वाचवण्यात आली.

दोन युवकांचे अपहरण, मारहाणप्रकरणी आणखी तिघांना अटक

करंझाळे येथील समुद्र किनाऱ्यावरून एका तरुणाचे व त्याच्या मित्राचे अपहरण करून जबर मारहाण केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी फरार असलेला मुख्य सूत्रधार आकाश मुद्रस (२०, सांताक्रुझ), जावेद बल्लारी (२६, करंझाळे) आणि कल्पेश मोखर्डकर (२२, चिंबल) या तिघांना अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी याप्रकरणी शोएब बेग (ताळगाव) व झाकीउल्ला काझी (करंझाळे) या दोघांना अटक केली होती.

शुक्रवार

दोन पोलीस उपनिरीक्षकांचे निलंबन

मायणा-कुडतरी पोलीस मारहाण आणि लैंगिक छळ प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक संकेत नाईक आणि गौरव नाईक यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलीस उपमहानिरीक्षक वेद प्रकाश सूर्या यांनी जारी केला आहे. या प्रकरणात यापूर्वी एक हवालदार व दोन कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले होते.


कोपरवाडा-कुर्टी येथे कारच्या धडकेत पादचारी ठार

कोपरवाडा-कुर्टी रस्ता ओलांडणाऱ्या राजेश काकोडकर (२५, कोपरवाडा-कुर्टी) याला धावत्या कारची धडक बसल्याने त्याचा इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर लोकांची गर्दी झाल्याने काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

शनिवार


कुळे येथील नदीत बुडून तिघा भावांसह चौघांचा मृत्यू

कुळे येथील मेटावाडा भागात पुलाजवळील दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या वास्को परिसरातील चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये चिखली-मुरगाव येथील एकाच कुटुंबातील तीन भावांचा समावेश आहे. रामन पारसू मदार (वय १९, चिखली), लक्ष्मण पारसू मदार (वय १९, चिखली), हिरण्णा पारसू मदार (चिखली) आणि विजय साजिली (रा. न्यू वाडा, वास्को) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. विजय हा झुआरीनगर येथील वसंत जोशी कॉलेजचा विद्यार्थी होता.

पोलीस हवालदारासह सहा जणांना अटक

आमोणा येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सुरक्षा ताफ्याला होणारी बोलेरो गाडीची भीषण धडक थोडक्यात टळली. मुख्यमंत्र्यांच्या वाहनचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली. बोलेरो गाडीचा चालक समीर फडते हा स्वतः पोलीस हवालदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. डिचोली पोलिसांनी या प्रकरणी हवालदारासह एकूण ६ जणांना अटक केली.

लक्षवेधी

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून एका उत्पादन शुल्क खात्याच्या कर्मचार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहनचालक सुदेश गावस देसाई याला मडगाव येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने ५२ लाख ३६ हजार ९४० रुपयांची भरपाई मृताच्या वारसांना देण्याचे आदेश दिले. पीठासीन अधिकारी राम एस. प्रभू देसाई यांनी हा निकाल दिला.

न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून धिरयो संदर्भात कडक निर्बंध असतानाही कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धिरयोंचे आयोजन सुरुच आहे. रविवारी वार्का येथे बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

स्मार्ट मीटरमुळे वीजबिलांमध्ये वाढ झाल्याच्या, तसेच विविध तक्रारी समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरची कार्यवाही सध्या स्थगित ठेवण्याचे आदेश वीज खात्याला दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच ग्राहकांच्या मंजूर वीजभाराची (लोड) तपासणी करून वीजबिलांची पडताळणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

हेही वाचा