स्मार्ट मीटरविरोधात ‘आप’चा ढवळीकरांच्या घरावर मोर्चा

पोलिसांनी नागेशीतच रोखला : स्मार्ट मीटर सक्ती रद्द करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th June, 11:39 pm
स्मार्ट मीटरविरोधात ‘आप’चा ढवळीकरांच्या घरावर मोर्चा

आम आदमी पक्षाचा मोर्चा नागेशी जंक्शनजवळ पोलिसांनी रोखला.

फोंडा : नागेशी-बांदोडा येथे स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पक्षा (आप)च्या कार्यकर्त्यांनी शनिवारी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागेशी येथे पोलिसांनी मोर्चा रोखून धरल्याने कार्यकर्त्यांना पुढे जाता आले नाही. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्मार्ट मीटरसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सध्या स्थगित ठेवला असल्याचे स्पष्ट केले.
स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करण्यासाठी आपने शनिवारी सकाळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या घरावर मोर्चा नेण्याचे आयोजन केले होते. मोर्चाची पूर्वकल्पना मिळाल्याने नागेशी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चामध्ये आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, संदेश तळेकर, गीतेश नाईक, ममता बेग यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, पोलिसांनी नागेशी जंक्शनजवळच मोर्चा अडवून पुढे जाण्यास मज्जाव केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना वाल्मिकी नाईक यांनी स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढीव वीजदर यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचा आरोप केला. स्मार्ट मीटर सक्ती रद्द करावी तसेच वाढीव वीजदर मागे घ्यावेत, यासाठी आप सातत्याने आवाज उठवत आहे. वीजमंत्री ढवळीकर यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र, पोलिसांनी आम्हाला रोखले. सरकार सामान्य जनतेच्या जीवनाशी खेळत आहे, अशी टीका त्यांनी केली.
प्रसिद्धीसाठी मोर्चा काढल्याचा आरोप
आम आदमी पक्षावर टीका करताना ढवळीकर म्हणाले, विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा माझ्या घराजवळ आला असता, तर तेथे आधीच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मला भेटण्यासाठी ५०० हून अधिक लोक उपस्थित होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा