'पेज आंदोलना'ला घाबरून सरकारने घेतले नमते : अमित पालेकर

आझाद मैदानावर 'मणगणे' खाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले तोंड गोड!

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
15 mins ago
'पेज आंदोलना'ला घाबरून सरकारने घेतले नमते : अमित पालेकर

पणजी : अन्यायकारक वीज बिलांच्या निषेधार्थ आम्ही छेडलेल्या 'पेज आंदोलना'ला राज्य सरकार घाबरले आहे. वाढीव वीज बिलांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, ही भीती भाजपला सतावत आहे. याच भीतीपोटी सरकारने स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असून, अतिरिक्त भारासाठीचे (लोकल लोड) दंडात्मक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा काँग्रेसचे अँड. अमित पालेकर यांनी केला. शनिवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी योगेश गोवेकर, गजानन तिळवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सरकारला नमते घ्यायला लावल्याच्या आनंदात कार्यकर्त्यांनी या वेळी 'मणगणे' (गोडशे) खाऊन विजय साजरा केला.



पालेकर पुढे म्हणाले की, अतिरिक्त वीजभार वापरल्याचे कारण पुढे करत वीज खात्याने ग्राहकांवर दंडात्मक शुल्क लादले होते. यामुळे नेहमीपेक्षा पाचपट अधिक वीज बिले आल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले होते. एका सर्वसामान्य ग्राहकाचे वीज बिल ८०० रुपयांवरून थेट ५ हजार रुपयांवर पोहोचले होते. खात्याने असा दंड आकारण्यापूर्वी ग्राहकांना पूर्वकल्पना देणे किंवा नोटीस बजावणे अत्यंत आवश्यक होते. या अन्यायाविरोधात आम्ही सुरू केलेल्या 'पेज आंदोलना'ला राज्यभरातून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अखेर जनतेच्या या रोषाला घाबरूनच सरकारने हा जनविरोधी निर्णय मागे घेतला आहे. भाजपच्या या मनमानी कारभारावर मात करायची असेल, तर जनतेने अधिक संख्येने रस्त्यावर येणे गरजेचे आहे. लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी भाजपला सत्तेबाहेर काढणे हाच एकमेव पर्याय आहे.

या वेळी बोलताना योगेश गोवेकर म्हणाले की, जनतेने अन्यायाविरोधात एकत्र येऊन रस्त्यावर संघर्ष केला तर काय घडू शकते, हे आज या निर्णयावरून सिद्ध झाले आहे. आमच्या आंदोलनामुळे सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. आम्हाला आमदारकीची स्वप्ने पडलेली नाहीत, आम्ही केवळ सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहोत. बहुजन समाजाच्या पक्षाला स्वतःच्या घरची जहागीर समजणाऱ्यांनी आता आपल्या पुढील राजकीय कारकीर्दीचा विचार करावा. २०२७ मध्ये जर पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आले, तर गोमंतकीयांना पेज आणि मणगणे खाणेही दुरापास्त होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मंत्री सुदिन ढवळीकरांना मणगणे खाण्याचे आमंत्रण!

आमच्या 'पेज आंदोलना'ला मोठे यश आले असून जनतेचा छळ करण्याचा सरकारचा प्रयत्न आम्ही उधळून लावला आहे, अशी प्रतिक्रिया गजानन तिळवे यांनी दिली. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व गोमंतकीयांचे त्यांनी आभार मानले. पुढे बोलताना ते म्हणाले की, स्मार्ट मीटरला स्थगिती मिळाल्यामुळे वीजमंत्री सुदिन ढवळीकर अत्यंत निराश झाले आहेत. त्यांनीही नैराश्य झटकून आमच्या आनंदात सहभागी व्हावे आणि येथे येऊन मणगणे खावे, असे उपरोधिक आमंत्रण तिळवे यांनी या वेळी मंत्र्यांना दिले.

हेही वाचा