Home >> गोवा >> कुळे येथील नदीत बुडून वास्कोतील ४ तरुणांचा मृत्यू; दुर्घटनेत तिघा भावांचा समावेश

कुळे येथील नदीत बुडून वास्कोतील ४ तरुणांचा मृत्यू; दुर्घटनेत तिघा भावांचा समावेश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th June, 11:24 am
कुळे येथील नदीत बुडून वास्कोतील ४ तरुणांचा मृत्यू; दुर्घटनेत तिघा भावांचा समावेश

पणजी  :  कुळे येथील मेटावाडा भागात पुलाजवळील दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या वास्को परिसरातील चार तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये चिखली-मुरगाव येथील तीन सख्ख्या भावांचा समावेश असून हे सर्व युवक १९ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. ही घटना आज शनिवार १३ जून रोजी सकाळी घडली. 




कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या युवकांची ओळख पटली असून त्यांची नावे रामण्णा परसू मदार (वय १९, रा. आदर्श नगर, चिखली, मुरगाव), लक्ष्मण परसू मदार (वय १९, रा. आदर्श नगर, चिखली, मुरगाव), हिरण्णा परसू मदार (रा. आदर्श नगर, चिखली, मुरगाव) आणि विजय साजिली (रा. न्यू वाडा, गणेश मंदिराजवळ, वास्को). विजय हा झुआरीनगर येथील वसंत जोशी कॉलेजचा विद्यार्थी होता.




घरून परवानगी घेऊन काढली होती सहल

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वास्को आणि चिखली परिसरातील पाच मित्र शनिवारची सुट्टी साजरी करण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कुळे येथील दूधसागर नदीकाठी आले होते. मदार बंधूंनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांची रीतसर परवानगी घेतली होती. दुपारपर्यंत घरी परत येऊ असे ते घरच्यांना म्हणाले होते. प्रवासादरम्यान खाण्यासाठी त्यांनी घरूनच जेवणाचा डबा आणि इतर खाद्यपदार्थही सोबत तयार करून घेतले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास हे पाचही मित्र रेल्वेने कुळे स्थानकावर पोहोचले आणि तिथून नऊच्या सुमारास मेटावाडा येथील दूधसागर नदीपात्राजवळ गेले.




पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

नदीकाठी पोहोचल्यानंतर पोहण्याचा आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी तरुण नदीपात्रात उतरले. मात्र,  नदीतील पाण्याचा प्रवाह, वेग आणि खोलीचा त्यांना अजिबात अंदाज आला नाही. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला लक्ष्मण मदार याने पाण्यात उडी घेतली होती. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो अचानक खोल पाण्यात ओढला गेला आणि बुडू लागला.

आपला भाऊ पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी रामन आणि हिरण्णा हे दोन्ही भाऊ आणि त्यांचा मित्र विजय यांनी तातडीने नदीत उड्या घेतल्या. दुर्दैवाने, पाण्याचा वेग आणि खोली जास्त असल्यामुळे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही जण एकापाठोपाठ एक खोल पाण्यात बुडाले.




पाचव्या मित्राचे आटोकाट प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेची धाव

या पाच जणांच्या गटातील वाचलेला एकमेव मित्र (जो नदीच्या बाहेर होता) याने आपल्या मित्रांना डोळ्यांदेखत पाण्यात बुडताना पाहिले. तरुणांचा आरडाओरडा ऐकून त्याने अत्यंत प्रसंगावधान राखले आणि नदीकाठी पडलेल्या एका लाकडाच्या ओंडक्याच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचा आणि वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रचंड प्रवाहापुढे त्याचे प्रयत्न अपुरे पडले.




मित्रांना वाचवणे आपल्या हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच त्याने आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना बोलावले आणि स्वतः धावत जाऊन तात्काळ कुळे पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अग्निशामक दलाचे पथक आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.






घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम व बचावकार्य सुरू केले. नदीतील प्रवाहाचा अडथळा पार करत अथक परिश्रमानंतर चारही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आपल्या मुलांच्या मृत्यूची वार्ता समजताच न्यू वाडा येथील मदार बंधूंच्या घरी शोककळा पसरली.