महामार्ग ओलांडताना कारची स्कूटरला धडक; कोलवाळचे माजी पंच सदस्य ठार

चार रस्ता जंक्शन येथे अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
47 mins ago
महामार्ग ओलांडताना कारची स्कूटरला धडक; कोलवाळचे माजी पंच सदस्य ठार

म्हापसा : कोलवाळ येथे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कारची धडक स्कुटरला बसली. अपघातात दुचाकीस्वार मायकल फर्नांडिस (५५) हे जागीच ठार झाले. फर्नांडिस हे कोलवाळ पंचायतीचे माजी पंच सदस्य होते.


हा अपघात शनिवार,दि. १३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोलवाळ चिखली पूर्वीचे चार रस्ता जंक्शन येथे घडला. सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे हे जंक्शन बंद करण्यात आले आहे. तरीही चिखली तसेच कोलवाळ गावातील लोक विशेषत: दुचाकीस्वार महामार्गावरील दुभाजक ओलांडून मार्गक्रमण करतात.

घटनास्थळी दुचाकीस्वार मायकल फर्नांडिस हे आपल्या जीए ०३ एसी ४२४४ क्रमांकाच्या अॅक्टिव्हा स्कुटरवरून महामार्ग ओलांडून कोलवाळ गावात जाण्याचा प्रयत्नात होते. यावेळी दीपक सावंत (रा. धारगळ) हे कोलवाळहून धारगळच्या दिशेने आपल्या जीए ११ ए ५०९५ क्रमांकाच्या कारगाडीने जात होते.

अपघातस्थळी कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वार फर्नांडिस हे गंभीर झाले. त्यांना रूग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघाताचा पंचनामा कोलवाळ पोलीस उपनिरीक्षक स्वानंद प्रभू व सहाय्यक उपनिरीक्षक अनिल पिळगावकर यांनी केला. पंचनाम्यानंतर मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवून देण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

धोकादायक क्रॉसिंग ठरले जीवघेणे

हा अपघात चार रस्ता जंक्शन परिसरात घडला. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे सध्या हे जंक्शन बंद करण्यात आले असले, तरी चिखली आणि कोलवाळ गावातील नागरिक, विशेषतः दुचाकीस्वार, दुभाजक ओलांडून महामार्गावरून ये-जा करत असल्याचे दिसून येते. हा दुभाजक ओलांडत असताना अपघात झाला. 

हेही वाचा