ऑनलाईन कर्जाच्या नादात हातातील पैशांवर पाणी

बनावट अ‍ॅपद्वारे राय येथील महिलेची दीड लाखांची फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
ऑनलाईन कर्जाच्या नादात हातातील पैशांवर पाणी

मडगाव : ऑनलाईन कर्ज देणार्‍या कॅश बस आणि रुपेली या दोन मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून राय-साळशेत येथील महिलेची १ लाख ५१ हजार ८२० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारदार मलीहा शेख (रा. राय, साळशेत) यांनी २२ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ऑनलाईन कर्जासाठी कॅश बस आणि रुपेली या प्लॅटफॉर्मवर अर्ज केला होता. हे अधिकृत आर्थिक सेवा देणारे प्लॅटफॉर्म असल्याचे समजून त्यांनी ही प्रक्रिया केली. त्यानंतर, मलीहा यांच्या बँक खात्यात कोणतीही विनंती नसताना दोन वेगवेगळ्या व्यवहारांतून एकूण १,१४,८४० रुपये जमा झाले. त्यांनी ही रक्कम परत करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, त्यांच्या खात्यातून १,१४,८४० रुपये वजा झाले. मात्र, या व्यवहाराचा फायदा घेत अज्ञाताने अ‍ॅपच्या माध्यमातून मलीहा यांच्या खात्याचा ताबा मिळवला आणि त्यांच्या संमतीशिवाय वारंवार पैसे दुसर्‍या खात्यात वळवले. या व्यवहारांतून मलीहा शेख यांची एकूण १,५१,८२० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी आर्थिक फसवणुकीप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला. पोलीस उपनिरीक्षक आशुतोष नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा