३४ दुकानांना नोटीस, सुमारे दहा हजारांचा दंड वसूल

मडगाव : पावसाळापूर्व खबरदारी म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाने सासष्टी तालुक्यातील रुमडामळ, घोगळ व बाणावली परिसरात तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण ४३ खाद्य आस्थापनांची तपासणी करत ३४ जणांना नोटीस जारी केली तर ‘कोटपा’ कायद्याअंतर्गत सुमारे १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
अन्न व औषध विभागाच्या पथकाने रुमडामळ दवर्ली पंचायतीच्या पत्रानंतर या परिसरातील आस्थापनांच्या व्यवसाय नोंदणी परवाना व इतर अन्न सुरक्षा उपाययोजनांची पडताळणी केली. यात ४३ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ आस्थापने वैध अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणीशिवाय कार्यरत होती. या सर्व ३४ व्यावसायिकांना अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच, कोटपा कायद्यांतर्गत धूम्रपान निषेध फलक न लावल्याबद्दल १२ आस्थापनांना एकूण २,४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दरम्यान, यापूर्वीही रुमडामळ हाऊसिंग बोर्ड, घोगळ, मडगाव जुने मार्केट आणि बाणावली परिसरात सायंकाळच्या वेळी विशेष मोहीम राबवण्यात आल्या. या मोहिमेवेळी ३१ खाद्य केंद्रांची तपासणी करण्यात आली. यात आस्थापनांतील अस्वच्छतेबद्दल सात हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ५ आस्थापनांना कोटपा कायदा उल्लंघनासाठी १,२०० रुपयांचा दंड करण्यात आला. ही कारवाई दक्षिण गोवा नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई, माधव कवळेकर, झेनिया रोझारियो, प्रतिक्षा चोपडेकर आणि अमरदीप गावडे यांच्या पथकाने केली.
खाद्यपदार्थ वर्तमानपत्रातून देऊ नये!
सर्व आस्थापनांच्या व्यावसायिकांना त्रुटी सुधारण्यासाठी ५ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. याशिवाय अन्नपदार्थांसाठी वृत्तपत्रांच्या कागदाचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वापरलेले खाद्यतेल अधिकृत रुको एजन्सीमार्फतच नष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला.
पणजीत निकृष्ट मैसूर पाक विकणाऱ्याला २० हजारांचा दंड
अन्न व औषध प्रशासनाने पणजी महापालिका बाजारासमोरील मे. सनराईज स्वीट अँड सनराईज काजूवाला आस्थापनाला निकृष्ट दर्जाचा म्हैसूर पाक विक्री केल्याच्या कारणावरून २०,००० रुपयांचा दंड ठोठावला. मैसूर पाकमध्ये टार्टाझीन हे रंगद्रव्य निर्धारित मानक कमाल मर्यादेपेक्षा जास्त होते.