राज्यभरात गोवा राखण यात्रा काढणार : युरी आलेमाव

काँग्रेस गोमंतकीयांना भाजपविरोधात एकत्र आणणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th June, 11:36 pm
राज्यभरात गोवा राखण यात्रा काढणार : युरी आलेमाव

पदाधिकार्‍यांना संबोधित करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव.

मडगाव : भाजप विरोधात गोमंतकीयांना एकत्रित आणण्याचे काम काँग्रेस करेल. त्यासाठी राज्यातील ४० ही मतदारसंघात गोवा राखण यात्रा काढण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष युरी आलेमाव यांनी केली.
दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हा तसेच ब्लॉक पदाधिकार्‍यांना संबोधित करताना विरोधी पक्षनेते तथा आमदार युरी आलेमाव यांनी भाजपने गोवा आणि गोवेकरांविरुद्ध केलेली पापे अक्षम्य असल्याची टीका केली.
यावेळी आलेमाव यांनी ‘काँग्रेसचो मांड’ या नव्या उपक्रमाचीही घोषणा केली. या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते, पक्षाचे नेते, हितचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन विविध प्रश्नांवर चर्चा आणि संवाद साधणार आहेत. या चर्चांमधून जनतेच्या अपेक्षा, समस्या आणि सूचना जाणून घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
आलेमाव पुढे म्हणाले की, काँग्रेसचो मांडमधील चर्चेतून येणार्‍या सूचनांचा समावेश पक्षाच्या जाहीरनाम्यात केला जाईल. जनतेमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊ. काँग्रेसची सत्ता आल्यावर या समस्यांचे निराकरण केले जाईल व गोवा संवर्धनाचे काम केले जाईल.
काँग्रेसने नेहमीच लोकहितासाठी काम केले असून, जनतेचा विरोध असलेले प्रकल्प रद्द केले आहेत. मात्र, भाजप सरकार लोकांवर नको असलेले प्रकल्प लादत असून, जनतेचा आवाज दाबला जात आहे, अशी टीका त्यांनी केली. या बैठकीला कार्याध्यक्ष एम. के. शेख, आमदार एल्टन डिकॉस्टा, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष अझीझ नरोन्हा, कुशावती अध्यक्ष राजेश वेर्णेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

३९-एसह वादग्रस्त कायदे रद्द करण्याचे आश्वासन
राज्याच्या विनाशासाठी साधन म्हणून वापरले जात असल्याचा आरोप करत आलेमाव यांनी ३९-ए आणि इतर काही कायदेशीर कलमे काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास रद्द करण्यात येतील, असे आश्वासन दिले. गोव्याच्या जमीन, पर्यावरण आणि स्थानिक हितांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. जनतेच्या विरोधात असलेले निर्णय आम्ही स्वीकारणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा