गोव्यात पतीकडून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारात वाढ

एनएफएचएस-६ अहवाल : शहरी महिलांवरील हिंसाचाराचे प्रमाण चाैपट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th June, 11:35 pm
गोव्यात पतीकडून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारात वाढ

पणजी : राज्यातील महिलांविरुद्धच्या कौटुंबिक हिंसाचाराबाबत राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस-६) मधून चिंताजनक चित्र समोर आले आहे. गोव्यात शहरी भागातील महिलांना पतीकडून होणाऱ्या शारीरिक अथवा लैंगिक हिंसाचाराचा सामना ग्रामीण भागातील महिलांपेक्षा चारपटीने अधिक करावा लागत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
अहवालानुसार, शहरी भागातील १६.२ टक्के महिलांनी पतीकडून कधी ना कधी हिंसाचाराचा सामना केल्याचे नमूद केले आहे. त्याउलट ग्रामीण भागात हे प्रमाण केवळ ४.५ टक्के आहे. या सर्वेक्षणात १८ ते ४९ वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित, विधवा अथवा सध्या पतीसोबत राहत नसलेल्या महिलांचा समावेश करण्यात आला होता.
एनएफएचएस-५ आणि एनएफएचएस-६ या दोन सर्वेक्षणांमधील आकडेवारीची तुलना केल्यास गोव्यात महिलांवरील वैवाहिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. एनएफएचएस-५ मध्ये पतीकडून हिंसाचाराचा सामना केल्याचे सांगणाऱ्या महिलांचे प्रमाण ८.३ टक्के होते. मात्र, एनएफएचएस-६ मध्ये हेच प्रमाण वाढून ११.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ३ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.
देशातील विविध राज्यांच्या तुलनेत जम्मू आणि काश्मीरमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच ३.४ टक्के आहे. नागालँड (४ टक्के), हिमाचल प्रदेश (४.३ टक्के), मेघालय (५.९ टक्के) यांच्यासह ईशान्येकडील राज्यात हे प्रमाण कमी आहे. तर बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३६.१ टक्के आहे. तेलंगणा (३०.८ टक्के), तामिळनाडू (२८.५ टक्के), उत्तर प्रदेश (२८.५ टक्के), झारखंड (२७ टक्के) या राज्यात हे प्रमाण तुलनेने अधिक आहे.
संपूर्ण देशात गरोदर असताना होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये देशपातळीवर काहीशी घट झाली आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराचा सामना केलेल्या महिलांचे प्रमाण ३.१ टक्क्यावरून कमी होऊन २.७ टक्के झाले आहे.
राष्ट्रीय स्तरावर मात्र घट
गोव्यात हिंसाचाराचे प्रमाण वाढले असले तरी राष्ट्रीय स्तरावर या प्रकारच्या घटनांमध्ये घट झाल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. देशभरात पतीकडून हिंसाचाराचा सामना केलेल्या महिलांचे प्रमाण २९.२ टक्क्यांवरून कमी होऊन २२.३ टक्क्यांवर आले आहे. ग्रामीण भारतात हे प्रमाण २४.४ टक्के असून शहरी भागात १७.५ टक्के आहे. त्यामुळे राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत गोव्यातील एकूण प्रमाण कमी असले तरी वाढीचा कल चिंतेचा विषय मानला जात आहे.       

हेही वाचा