२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी शक्य : प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th June, 03:26 pm
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी शक्य :  प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

पणजी : आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप अनेक नवीन चेहऱ्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केवळ पक्षाकडे उमेदवारी मागितली म्हणून तिकीट मिळणार नाही, तर संबंधित उमेदवाराने पक्षासाठी केलेले काम आणि योगदान पाहिले जाईल. उमेदवारी देताना पक्षाप्रती निष्ठा आणि प्रामुख्याने निवडून येण्याची क्षमता (इलेक्टॅबिलिटी) या गोष्टींचाच प्रामुख्याने विचार केला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नुकताच दिल्ली दौरा करून गोव्याचे प्रभारी बी. एल. संतोष यांच्याकडे २०२७ च्या निवडणुकीचा 'ॲक्शन प्लॅन' (कृती आराखडा) सादर केला. या कृती आराखड्यात तरुणांना आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या दिल्ली दौऱ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते.

पक्षाचा आगामी कृती आराखडा दिल्लीतील केंद्रीय नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात किमान ३० मतदारसंघांत विजय मिळवण्याचे आमचे मुख्य ध्येय आहे, असे नाईक यांनी सांगितले.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ५१ टक्क्यांवर पोहोचली होती. याच धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीतही प्रत्येक मतदारसंघात मतांची ५१ टक्केवारी गाठण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न राहतील. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि पक्षात नवी ऊर्जा भरण्यासाठी २०२७ मध्ये नवीन चेहरे रिंगणात उतरवले जाऊ शकतात. परंतु, हे करताना पक्ष पुन्हा सत्तेवर येण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व राजकीय समीकरणांचा त्यात अंतर्भाव असेल, अशी माहितीही नाईक यांनी दिली.

तिकीट वाटपापूर्वी उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता, त्याची प्रत्यक्ष कार्यपद्धती, पक्षासाठी त्याने दिलेले योगदान, तसेच अनेक वर्षांचा संघटनात्मक कामाचा अनुभव विचारात घेतला जाईल. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' उपक्रम किंवा पक्षाचे विविध जनसंपर्क अभियान (आऊटरीच प्रोग्राम) यांमध्ये उमेदवाराचा सहभाग किती सक्रिय होता, याचीही कडक पडताळणी केली जाईल. केवळ तिकीट हवे म्हणून उतावळेपणा करण्यापेक्षा ग्राउंड लेव्हलवर पक्षाचे काम करणे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अत्यंत महत्त्वाचे आहे, असे दामू नाईक यांनी आवर्जून सांगितले.


हेही वाचा