‘संध्याकाळी परततो’ सांगून गेलेली लेकरे आईपासून कायमची दुरावली

आईची हरपली शुद्ध, कुटुंबाने फोडला टाहो : घटनेने प्रत्येकाचे पाणावले डोळे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
53 mins ago
‘संध्याकाळी परततो’ सांगून गेलेली लेकरे आईपासून कायमची दुरावली

वास्को : ‘आम्ही संध्याकाळपर्यंत घरी येऊ,’ असे आईला सांगून सहलीला गेलेले तीन सख्खे भाऊ आणि त्यांच्या एका मित्राचा बुडून अंत झाल्याने वास्को परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सकाळी घरातून हसतखेळत बाहेर पडलेल्या या चारही तरुणांचे मृतदेहच परतल्याने त्यांच्या आईवडिलांची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. नवे वाडे येथील त्यांच्या घराजवळ सांत्वन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून परिसरातील चित्र अत्यंत हृदयद्रावक आहे.


तीन मुलांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नवे वाडे परिसरातील शेजारी आणि आसपासच्या वस्तीतील नागरिकांनी त्यांच्या घराजवळ मोठी गर्दी केली. एकाच वेळी तीनही मुलांना काळाने नेल्याचे समजताच त्यांच्या आईची शुद्धच हरपली. शेजारीपाजारी त्यांना धीर देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. मात्र, आक्रोश करणाऱ्या कुटुंबाला पाहून उपस्थित प्रत्येकाचे काळीज हेलावून गेले.

आईने बनवून दिला होता डबा

नवे वाडे येथे राहणारे हिरण्णा मदार (२१), रामण्णा मदार (१९) आणि लक्ष्मण मदार (१९) या तीन सख्ख्या भावांनी शनिवारी (दि. १२) सकाळी आपले मित्र विजय साजिली (२०) आणि राहुल महादेव हरिजन (२०) यांच्यासोबत सहलीला जाण्याचा बेत आखला होता. शुक्रवारी रात्रीच त्यांनी याबद्दल आईला सांगितले होते. त्यामुळे शनिवारी सकाळी आईने त्यांना सहलीच्या ठिकाणी खाण्यासाठी प्रेमाने जेवणाचा डबा बनवून दिला होता. रामण्णा व लक्ष्मण या जुळ्या भावांसोबत मोठा भाऊ हिरण्णा असल्याने आईला काळजी वाटली नाही.

मित्राचा इशारा ठरला निष्फळ

सहलीच्या ठिकाणी पोहोचल्यावर राहुलने पाण्याचा डोह खोल असून पोहणे धोकादायक असल्याचे सांगत सर्वांना त्या जागेपासून दूर नेले होते. मात्र, दुर्दैवाने ते तिघे भाऊ पुन्हा त्याच डोहाकडे गेले. त्यामुळे राहुल व विजयही त्यांच्या मागोमाग तिथे पोहोचले. हिरण्णा, रामण्णा, लक्ष्मण आणि विजय एकाच ठिकाणी पोहू लागले, तर राहुल त्यांच्यापासून थोडे दूर पाण्यात उतरला. या चार जणांपैकी कोणीतरी एकाला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघेही गेले असावेत, त्यामुळे या चौघांचाही दुर्दैवी अंत झाला.

हलाखीची परिस्थिती अन् उद्ध्वस्त स्वप्ने

१) मदार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील परशू मदार हे मजुरी करतात, आई लोकांकडे घरकाम करते, तर बहीण एका खासगी आस्थापनात कामाला आहे.

२) हे कुटुंब नवे वाडे येथील रेल्वेमार्गालगतच्या एका घरात भाड्याने राहते. मोठा मुलगा हिरण्णा एका हॉटेलमध्ये काम करत होता. तर रामण्णा आणि लक्ष्मण हे बोगदा येथील आयटीआय केंद्रात शिकत होते, ज्यांचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार होते.

३) विजय साजिली हा झुआरीनगर येथील एमईएस महाविद्यालयात बीबीए (शिपिंग व लॉजिस्टिक) च्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्यांच्यासोबत असलेला राहुल हा वेर्णा येथील आग्नेल महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.


हेही वाचा