कणकुंबीत अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारामुळे प्रकृती स्थिर

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
2 hours ago
कणकुंबीत अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

जोयडा : बेळगाव जिल्ह्यातील कणकुंबी वनक्षेत्रात बुधवारी सायंकाळी शेतातील काम आटोपून घरी परतत असलेल्या एका शेतकऱ्यावर (farmer) अस्वलाने (wild bear) हल्ला (attack) केला. महेश बाबू गावडे (२५) असे या जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारामुळे त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हुंड गावाजवळील आपल्या शेतातून महेश गावडे घरी परतत असताना अचानक जंगलातून बाहेर आलेल्या अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे त्याला सावरण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही, तरीही त्याने धैर्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. महेश आणि त्या अस्वलाची काही काळ झटापट झाली आणि त्यानंतर अस्वल पुन्हा जंगलात निघून गेले. या झटापटीत महेशच्या हाताला, पायाला आणि शरीराच्या इतर भागांना अनेक जखमा झाल्या. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी शेतकऱ्याला तत्काळ बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

या घटनेनंतर वनक्षेत्राच्या सीमेजवळ वसलेल्या कणकुंबी, हुंड आणि इतर गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटेच्या आणि संध्याकाळच्या वेळी शेतात जाण्याबाबत शेतकरी आणि शेतमजुरांनी चिंता व्यक्त केली आहे. 

हेही वाचा