अपघातात मृत युवकाच्या पालकांना ४९.७० लाखांची भरपाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29 mins ago
अपघातात मृत युवकाच्या पालकांना ४९.७० लाखांची भरपाई

मडगाव : कुंकळ्ळी येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या २४ वर्षीय यश घोडेकर या युवकाच्या पालकांना ४९.७० लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश मडगाव येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिले आहेत.

यश घोडेकर हा ३१ डिसेंबर २०२३ रोजी आपल्या दुचाकीवरून मडगाव येथून कुंकळ्ळीच्या दिशेने जात होता. पांझरखणी आईस फॅक्टरीनजीक गिरीश कोमरपंत (रा. पाळोळे, काणकोण) हे चालवत असलेल्या कारने यशच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या यशचा मृत्यू झाला. यश हा युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडमध्ये ऑफिसर म्हणून कार्यरत होता. त्याला दरमहा ३० हजार रुपये पगार होता.

सुनावणीदरम्यान पुराव्यांवरून असे सिद्ध झाले की, कार चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडला होता. कारचा मालक यशवंत नाईक आणि इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी यांना संयुक्तपणे ४९ लाख ७० हजार रुपये नुकसान भरपाई यशचे आईवडिल संदेश व विद्या घोडेकर यांना देण्याचे निर्देश देण्यात आले. कंपनीकडून मिळालेल्या ६ लाख रुपयांचे ग्रुप पर्सनल अ‍ॅक्सिडेंट बेनिफिट या भरपाईतून वजा करावेत, असा युक्तिवाद विमा कंपनीने केलेला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि हा लाभ स्वतंत्र कराराचा भाग असल्याचे स्पष्ट केले. नुकसान भरपाईच्या रकमेसाठी दावा दाखल केल्यापासून अदा करेपर्यंतच्या कालावधीत ६.८० टक्के व्याजही न्यायालयाने देण्यास सांगितलेले आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश राम एस. प्रभू देसाई यांच्यासमोर झाली. 

हेही वाचा