सॅम्युअलच्या आत्महत्येबाबत फेसबूक, इन्स्टाग्रामला पोलिसांचे पत्र

व्हायरल व्हिडिओचा मूळ स्त्रोत जाणून घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
सॅम्युअलच्या आत्महत्येबाबत फेसबूक, इन्स्टाग्रामला पोलिसांचे पत्र

म्हापसा : गावसावाडा येथील सॅम्युअल गार्विन दी ब्रागांझा (२२) या युवकाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेला आणि व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओ संदर्भात म्हापसा पोलिसांनी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना पत्र पाठवून माहिती मागवली आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा मूळ स्त्रोत जाणून घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून याच अनुषंगाने पोलिसांनी हे पत्र पाठवले आहे. हा व्हिडिओ चित्रित केलेला मोबाईल फोन पोलिसांनी सध्या जप्त केला आहे.

म्हापसा पोलिसांनी मेटा फेसबूक, इन्स्टाग्राम, यू ट्यूब तसेच इतरांना हा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती देण्याची विनंती केली आहे. ही माहिती आल्यावर प्रथम कोणत्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता व तो सदर फ्लॅटफॉर्मवर अपलोड कुणी केला. याबाबतची माहिती उघडकीस येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस आपली पुढील कारवाई करणार आहेत.

दि. ३ जून रोजी हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता. त्यानंतर दि. ४ रोजी सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई तसेच ही आत्महत्येची घटना घडली होती.

आम्ही सर्व सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मना सदर व्हायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात माहिती देण्याची सूचना केली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

दि. ५ रोजी उत्तर रात्री १२.३० वा. सुमारास सॅम्युअल याने राहत्या घरी स्वत:वर देशी कट्टा पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. तत्पूर्वी दि. ४ रोजी सकाळी त्याचा गावसावाडा म्हापसा येथे रस्त्याच्या कडेला कचरा टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत म्हापसा पोलिसांनी सॅम्युअलवर गुन्हा नोंद केला होता. हा गुन्हा नोंद झाल्यावर घरी गेल्यानंतर दोन तासांच्या आत सॅम्युअलने हे टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले होते.

मृत सॅम्युअलच्या कुटुंबियांनी या आत्महत्येस सदर व्हिडिओ व्हायरल करणारी व्यक्ती, प्रसारमाध्यमे आणि चौकशीच्या नावाखाली पोलीस स्थानकात ताटकळत ठेवणारे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक असल्याचा दावा केला होता. त्यानंतर सॅम्युअलच्या आईने या एकंदरीत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी तक्रार पोलीस महासंचालक व उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. या तक्रारीनुसार पोलीस खात्याने पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्याकडे चौकशीचे सूत्रे सोपवली आहेत.

मानवाधिकार आयोगाने राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना नोटीस जारी केली आहे. त्यानुसार, सोमवार ८ रोजीपासून अधीक्षक कर्पे सध्या या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत आहेत.

पिस्तुलाबाबत अद्याप सस्पेन्स कायम

दरम्यान, सॅम्युअलने स्वत:वर गोळी झाडून आपले जीवन संपवले, त्या पिस्तुलाबाबत आम्हाला कोणतीही माहिती किंवा कल्पना नाही. ते पिस्तूल त्याच्याकडे कधी व कुठून आले, हे ठाऊक नाही. तसेच शवचिकित्सा अहवालात नमुद केलेली सॅम्युअलच्या डोळ्याजवळील गंभीर जखमेबाबत देखील आम्हाला काहीच माहिती नसल्याचा जबाब मृताची आई व बहिणींनी पोलिसांना दिला आहे. 

हेही वाचा