सहाव्या वेतन आयोगाएवढे मिळणार वेतन

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मनुष्यबळ विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता सहाव्या वेतन आयोगाएवढे वेतन दिले जाणार आहे. याबाबतचा आदेश लवकरच जारी केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सध्या मनुष्यबळ विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना १४ हजार, १८ हजार, असे पदाप्रमाणे वेतन दिले जाते.
मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे ऑफिस असिस्टंट, सुरक्षारक्षक, एमटीएस, ड्रायव्हर, सुपरवायझर या पदांसाठी भरती केली जाते. महामंडळातर्फे भरती केल्यानंतर आवश्यक खात्यात पाठविले जाते. सध्या एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती महामंडळातर्फे करण्यात आली आहे. आणखीही भरती केली जाणार आहे. कायमस्वरूपी सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते; मात्र महामंडळाअंतर्गत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन दिले जाते. यासाठी काही जण निवड झाल्यानंतरही नियुक्तीपत्र स्वीकारत नाहीत. या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला जाणार नसला तरी सहाव्या वेतन आयोगा समकक्ष वेतन दिले जाईल. यामुळे ऑफिस असिस्टंट, सुरक्षारक्षक, एमटीएस, ड्रायव्हर या पदांसाठी योग्य व गुणवान उमेदवार अर्ज करतील. सरकारी खात्यात होणाऱ्या नियुक्तीवेळी मनुष्यबळ विकास महामंडळाअंतर्गत काम केलेल्या अनुभवाचाही विचार केला जातो. ज्या खात्यात कर्मचाऱ्यांची उणीव असते, तेथे मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाते.
खासगी कर्मचाऱ्यांना सुविधा, सवलती देणार
दरम्यान, खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सरकारतर्फे सवलती, तसेच आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. काही खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत तुटपुंजे वेतन मिळते. तरीही अनुभव प्राप्त करून चांगली संधी मिळण्यासाठी बरेच जण कमी पगारावर खासगी नोकरी करतात. अशा कर्मचाऱ्यांना आता सरकारतर्फे सुविधा व सवलती देण्यात येतील.