किशोरवयीन मुलींमध्ये अॅनिमिया भविष्यातील मातृत्वासाठी ठरू शकते आव्हान!!!

निरोगी किशोरी म्हणजे निरोगी माता आणि निरोगी समाज. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने मुलींच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे.

Story: आरोग्य |
3 hours ago
किशोरवयीन मुलींमध्ये अॅनिमिया  भविष्यातील मातृत्वासाठी ठरू शकते आव्हान!!!

‘‘आई, मला पुन्हा शाळेत चक्कर आली.” १५ वर्षांची रूही शाळेतून घरी आल्यावर सोफ्यावर बसत म्हणाली. गेल्या काही महिन्यांपासून ती सतत थकलेली असायची. अभ्यासात लक्ष लागत नव्हते, खेळण्यात रस उरला नव्हता आणि चेहराही फिकट दिसू लागला होता. सुरुवातीला आई-वडिलांना वाटले की दहावीचा अभ्यास, ताण आणि वाढत्या वयामुळे असे होत असेल. पण डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर रूहीचे हिमोग्लोबिन खूपच कमी असल्याचे आढळले. तिला अॅनिमिया म्हणजेच रक्तक्षय झाल्याचे निदान झाले.

रूहीची स्थिती ही आज अनेक किशोरवयीन मुलींची वास्तविकता आहे. भारतात किशोरवयीन मुलींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण चिंताजनकरीत्या जास्त आहे. ही समस्या केवळ सध्याच्या आरोग्यावर परिणाम करत नाही, तर भविष्यातील मातृत्व आणि पुढील पिढीच्या आरोग्यावरही दूरगामी परिणाम करू शकते.

अॅनिमिया म्हणजे काय?

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी झाल्यास त्या स्थितीला अॅनिमिया म्हणतात. हिमोग्लोबिन हे रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे प्रथिन असून ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. हिमोग्लोबिन कमी झाल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि विविध तक्रारी निर्माण होतात.

किशोरवयात शरीराची वाढ झपाट्याने होत असते. त्याचबरोबर मासिक पाळी सुरू झाल्यामुळे शरीराला अधिक लोहाची गरज भासते. यावेळी योग्य पोषण न मिळाल्यास अॅनिमियाची समस्या निर्माण होऊ शकते.


अॅनिमियाची लक्षणे

अॅनिमियाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा साधा थकवा म्हणून  समजला जातो. मात्र खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये:

 सतत थकवा आणि अशक्तपणा

 चक्कर येणे

 डोकेदुखी

 चेहरा, ओठ आणि नखे फिकट दिसणे

 अभ्यासात एकाग्रता कमी होणे

 श्वास लागणे

 हृदयाचे ठोके वाढणे

 केस गळणे

 चिडचिडेपणा आणि स्मरणशक्ती कमी होणे

किशोरवयीन मुलींमध्ये अॅनिमिया का होतो?

१. लोहयुक्त आहाराचा अभाव – हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, खजूर, गूळ, मांसाहार यांचे अपुरे सेवन.

२. मासिक पाळीमुळे रक्तस्राव – नियमित पाळी सुरू झाल्यानंतर शरीरातील लोहाचा साठा कमी होऊ शकतो.

३. जंक फूडचे वाढते सेवन – पौष्टिक आहाराऐवजी प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याची सवय.

४. कृमी संसर्ग – पोटातील जंतांमुळे पोषक घटकांचे शोषण कमी होते.

५. झपाट्याने होणारी शारीरिक वाढ – वाढत्या शरीराला अधिक लोहाची गरज असते.

भविष्यातील मातृत्वावर परिणाम

आजची किशोरी ही उद्याची माता असते. त्यामुळे किशोरवयात असलेला अॅनिमिया केवळ त्या काळापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचे परिणाम पुढील अनेक वर्षांपर्यंत दिसून येऊ शकतात. किशोरवयात शरीरात साठवला जाणारा लोहसाठा भविष्यातील गर्भधारणेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळातच लोहाची कमतरता असल्यास गर्भधारणेदरम्यान शरीराच्या वाढलेल्या गरजा पूर्ण करणे कठीण होऊ शकते.

अॅनिमियाग्रस्त महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान गंभीर अशक्तपणा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, श्वास लागणे, वारंवार संसर्ग होणे आणि दैनंदिन कामे करण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. गंभीर अॅनिमियामुळे गर्भातील बाळापर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण पोहोचण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

याचा परिणाम म्हणून अकाली प्रसूती, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, गर्भाची वाढ खुंटणे यांसारख्या गुंतागुंती निर्माण होण्याचा धोका वाढतो. काही वेळा नवजात बाळामध्येही लोहाची कमतरता आढळू शकते, ज्याचा त्याच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होऊ शकतो.

प्रसूतीच्या वेळी रक्तस्राव होणे ही सामान्य बाब असली तरी आधीपासून अॅनिमिया असलेल्या महिलांसाठी ते अधिक धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत रक्त चढवण्याची आवश्यकता भासू शकते आणि प्रसूतीनंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी अधिक कालावधी लागू शकतो.

याशिवाय, प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान देणे, त्याची काळजी घेणे आणि स्वतःच्या आरोग्याची जपणूक करणे यासाठी आईला पुरेशी ऊर्जा आवश्यक असते. अॅनिमियामुळे आईची शारीरिक क्षमता कमी होऊ शकते आणि प्रसूतीनंतरचा थकवा अधिक काळ टिकू शकतो.

म्हणूनच निरोगी मातृत्वाची तयारी ही गर्भधारणेच्या वेळी नव्हे, तर किशोरवयापासूनच सुरू व्हायला हवी. योग्य आहार, नियमित हिमोग्लोबिन तपासणी, आयर्न-फॉलिक अॅसिडचे सेवन आणि पोषणाविषयी जागरूकता यांद्वारे किशोरवयीन मुलींमध्ये अॅनिमिया रोखता येऊ शकतो. आजच्या मुलींच्या आरोग्यात केलेली ही गुंतवणूक उद्याच्या निरोगी मातांसाठी आणि सशक्त पिढीसाठी महत्त्वाची ठरेल.

प्रतिबंधासाठी काय करावे?

संतुलित आहार घ्या

आहारात पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्या, चवळी, हरभरा, राजमा, सोयाबीन, गूळ आणि तीळ, खजूर, मनुका, अंजीर, शेंगदाणे, अंकुरलेली कडधान्ये यांसारख्या पदार्थांचा समावेश असावा

व्हिटॅमिन सी वाढवा

लोहाचे शोषण वाढवण्यासाठी लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा, टोमॅटो यांचा नियमित वापर करावा.

चहा-कॉफी मर्यादित ठेवा

जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेतल्यास लोहाचे शोषण कमी होते.

नियमित तपासणी करा

हिमोग्लोबिन तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे. अॅनिमियाची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आयर्न-फॉलिक अॅसिड गोळ्यांचे महत्त्व

शाळा आणि सरकारी आरोग्य कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या आयर्न-फॉलिक अॅसिड गोळ्या नियमित घेणे आवश्यक आहे.

अॅनिमिया ही केवळ रक्ताची कमतरता नसून मुलींच्या शिक्षण, विकास, आत्मविश्वास आणि भविष्यातील मातृत्वाशी संबंधित गंभीर समस्या आहे. योग्य आहार, नियमित तपासणी आणि जागरूकता यांच्या मदतीने या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते. निरोगी किशोरी म्हणजे निरोगी माता आणि निरोगी समाज. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने मुलींच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर